नागपूर – महान्यूज लाईव्ह
तिने आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची फिर्याद नागपूरमध्ये कळमना पोलिस ठाण्यात दिली आणि पोलिस हादरले.. कामालाच लागले.. तब्बल २५० सीसीटीव्ही फुटेज आणि १ हजारहून अधिक कर्मचाऱ्यांनी तपास केला आणि अनेक तासांच्या तपासानंतर हे प्रकरण वेगळेच असल्याचे दिसून आले.
तिला प्रियकरासोबत लग्न करायचे होते हेच कारण यासाठी असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला, मात्र खोट्या बलात्काराच्या फिर्यादींनी अनेक जणांना आयुष्यातून उठवले असल्याने अशा खोट्या बलात्काराच्या फिर्यादी ओळखण्यासाठी पोलिसांना किती कसरत करावी लागते याचा वस्तुपाठही यातून दिसून आला.
नागपूरमधील एका १९ वर्षीय युवतीने चिखली परिसरातील एका निर्जन ठिकाणी आपल्यावर दोन लोकांनी बलात्कार केल्याची फिर्याद दिली. या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिस अधिकार्यांनी हे प्रकरण अधिक गांभिर्याने घेतले. त्यांनी शहरातील २५० सीसीटिव्ही फुटेज तपासले. वरिष्ठ अधिकाऱ्या्ंपासून होमगार्डपर्यंत १ हजारहून अधिक कर्मचारी या तपासात होते. ४० विशेष पथके यासाठी तैनात केली गेली. प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.
नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी यांनी सीताबर्डी पोलिस ठाण्यात ठाण मांडून १ हजार कर्मचाऱ्यांच्या पथकांना सूचना दिल्या होत्या. मात्र हातात अखेर खोटी बलात्काराची फिर्याद असाच धागा सापडला. या महिलेने तिच्या प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी हा बनाव रचला, मात्र बलात्काराची फिर्याद आणि लग्न करण्याचे नाटक याचा संबंध कसा काय असू शकतो हा प्रश्न मात्र आताही कायम राहीला आहे.











