राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : तालुक्यातील पाटस येथील दोन युवकांची निर्घृणपणे झालेली हत्या ही तालुक्यासाठी अंत्यत दुर्देवी घटना आहे. मात्र या दोन्ही युवकांच्या हत्यांकाडात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांना पोलीसांनी कोणत्याही दबावाला न जुमानता कायदेशीर कारवाई करून उर्वरीत आरोपींना अटक करावी अशी मागणी दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी केली.
पाटस येथे 4 जुलै रोजी शिवम संतोष शितकल आणि गणेश रमेश माखर या दोघांची दगडाने ठेचून क्रुरपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणात आठ जणांच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून यातील चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारा तासाच्या आत अटक केले होते.
ग्रामीण पोलीस अधिक्षक डॅा. अभिनव देशमुख हे आरोपी पकडेपर्यंत यवत पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. सध्या यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे या घटनेचा तपास करीत आहेत. यासंदर्भात दौंडचे माजी आमदार आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी जिल्हा ग्रामिण पोलीस अधिक्षक डॅा.अभिनव देशमुख यांची नुकतीच भेट घेवून या घटनेची विषयी आणि तपासाबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी संतोष शितकल, भिमा पाटस सहकारी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सत्वशील शितोळे, ग्रामपंचायत सदस्य राजू शिंदे, शिवाजी ढमाले, गणेश चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधिक्षक डॅा. अभिनव देशमुख यांच्याशी चर्चा करताना रमेश थोरात म्हणाले की, राहु येथील गोळी प्रकरणानंतर पाटस येथे ही घटना घडली आहे.
तालुक्यात अशा घटनांमुळे सामाजिक सलोखा बिघडत असून कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. पाटस येथील या दोन युवकांची हत्या की अत्यंत गंभीर बाब आहे. तालुक्यात पोलीसांचा धाक कमी झाला असून, कायद्याची भिती राहिली नाही. त्यामुळे सर्वसामान्य असुरक्षित आहेत. दोन युवकांच्या खुनातील उर्वरीत आरोपींना पोलीसांनी अद्यापही अटक केले नाही.
पोलीसांनी अशा घटनांमध्ये कोणत्याही राजकीय दवाबाला न जुमनता निष्पक्षपणे कारवाई केली पाहिजे. पोलीसांवर कोणत्याही राजकीय व्यक्तींचे फोन आले, तरी त्यांनी त्यांच्या पातळीवर तपास करून आणि संबंधित आरोपींना कायदेशीर कारवाई करायला हवी पाहिजे.
आमच्यासारखे राजकीय व्यक्ती फोन करतील मात्र पोलीसांनी त्यांचे काम करावे, खात्री करावी जे कोणी चुकीचे काम करीत असेल आणि अशा प्रकारचे खून करीत असतील तर अशांना आम्ही कदापि पाठीशी घालणार नाही, त्यांना कायदेशीर शिक्षा ही मिळायला हवी, जिल्हा ग्रामिण पोलीस अधिक्षकांनी स्वतः या प्रकारणात जातीने लक्ष घालून उर्वेरीत आरोपी यांना तत्काळ अटक करावी आणि पोलीस जर त्यांना अटक करीत नसतील तर हलगर्जीपणा करणारा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी माजी आमदार थोरात यांनी केली.
यावेळी पिडीत संतोष शितकल यांनी या घटनेत पै.परशुराम युवा मंचाचा प्रमुख आणि बारामती येथील काहींचा सहभागी असून तेही मुख्य आरोपी आहेत. तसे लेखी निवेदन ही यवत पोलीसांना दिले आहे. मात्र पोलीस त्यांना अटक का करीत नाहीत? त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी डॅा.अभिनव देशमुख यांच्याशी बोलताना केली.
तर सत्वशिल शितोळे म्हणाले, पाटसमध्ये अशी
घटना प्रथमच घडली आहे. या घटनेमुळे गावात भितीचे वातावरण आहे. उर्वरीत आरोपींना अटक न झाल्यास गावातील वातावरण बिघडेल आणि भविष्या गावात गुन्हेगारी वाढेल अशी भिती व्यक्त केली. त्यामुळे या घटनेतील सर्व आरोपींवर मोक्का सारखी कारवाई करावी अशी मागणी शितोळे यांनी बोलताना केली.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधिक्षक डॅा.अभिनव देशमुख म्हणाले, या प्रकरणात मी स्वतः लक्ष घातले आहे. या घटनेच्या तपासाचा मी सातत्याने आढावा घेत आहे. पोलीसांचा तपास सुरू आहे. उर्वरीत आरोपींना पोलीस लवकर अटक करतील. असे आश्वासन त्यांनी माजी आमदार रमेश थोरात आणि पीडीत संतोष शितकल यांना दिले.











