मुंबई : महान्यूज लाईव्ह
केंद्र सरकारने राज्याला २८ हजार कोटींची मदत करूनही राज्य सरकार मदत केली नाही अशी ओरड करीत असेल तर ते दुर्दैव आहे अशी टिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
आज समाजमाध्यमातून त्यांनी राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. सातत्याने महाराष्ट्राला केंद्राकडून काही मिळाले नाही अशी ओऱड होते आहे, म्हणून आज आपण सर्वांना आकडेवारी समजावी म्हणून मी सामोरे आलो असे ते म्हणाले.
ते म्हणाले,` सरकारने जे २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे, त्यामधील १ लाख कोटींच्या सूक्ष्म उद्योगाच्या पॅकेजमधून राज्याला १० हजार कोटी मिळू शकतात. त्यासाठी राज्याने प्रयत्न करावेत. आतापर्यंत केंद्राने १० हजार पीपीई किट १६ लाख मास्क दिले. राज्य सरकारला केंद्र सरकारने २८ हजार १०४ कोटी रुपयांची मदत केली. १९ हजार कोटी रुपये राज्य सरकारला केद्राकडून मिळाले असून कापूस खरेदीसाठी ५ हजार ७४७ कोटी, तांदूळ खरेदीसाठी २३११ कोटी, तूर खरेदीसाठी ५९३ कोटी, मका खरेदीसाठी १२५ कोटी तर पिक विम्यासाठी ४०३ कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले आहेत. १६२५ कोटींचे अनुदान उज्वला गॅस योजनेसाठी केंद्र सरकारने दिले.`
ते पुढे म्हणाले,` राज्य सरकार श्रमिकांच्या रेल्वेबाबत दिशाभूल करीत आहे. राज्यातून आतापर्यंत ६०० श्रमिक रेल्वे त्या त्या राज्यात पोचल्या. प्रत्येक रेल्वेमागे ५० लाखांचा असा ३२५ कोटींचा खर्च केंद्र सरकारने सोसला. राज्य सरकारने तिकिटांचे केवळ ७ ते ९ लाख रुपये खर्च केले. महिला, विधवा, दिव्यांगांसाठी केंद्र सरकारने ३८०० कोटींचे अनुदान राज्याला दिले. गरीब कल्याण पॅकेजमधून राज्याला ४ हजार ५९२ कोटींचे अन्नधान्य केंद्राने दिले. मजूरांच्या छावणीसाठी १६११ कोटी रुपये दिले. शेतीसाठी केंद्राकडून ९ हजार कोटी रुपयांची मदत केली. एमएसएमई ३५ हजार कोटी महाराष्ट्रातील उद्योजकांना मिळणार आहेत. गृहनिर्माणासाठी ३५ हजार कोटींचे अनुदान दिले आहे. देशांतर्गत रेरा पैकी ४० टक्के प्रकल्प एकट्या महाराष्ट्रात आहेत.`
२ लाख ७० हजार कोटी रुपयांची पॅकेजची मदत राज्याला मिळाली आहे. महाराष्ट्रावर अन्याय होतो अशी होणारी ओऱड चुकीची आहे. केंद्र सरकार आपल्याला किती कर मिळतो याचा विचार न करता राज्य सरकारला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदत करीत आहे असे फडणवीस यांनी सांगितले.










