सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
मागील आठवड्यात दिवसाकाठी 16 रुग्णांपर्यंत घसरलेला कोरोनाचा रुग्ण संख्येचा आकडा आता पुन्हा वाढू लागला आहे. हा कोरोनाचा रुग्ण संख्येचा आकडा पुन्हा चाळिशीत पोचला आहे. काही गावांमध्ये एकाच कुटुंबातील अनेक रुग्ण आढळण्याची देखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी करताना सावधान!
कोरोनाची रुग्ण संख्या थोडीशी खालावल्याने प्रशासनाने यावेळी एका महिन्याच्या आत नागरिकांना बाजारपेठेत येण्यासाठी मुभा दिली. मात्र त्याचा गैरफायदा घेताना लोक दिसत आहेत. कोरोना अजूनही संपलेला नाही आणि मोठी गर्दी करून लोक पुन्हा आपल्या कुटुंबियांना अडचणीत आणत आहेत. मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे, त्याचे कारण म्हणजे, रुग्ण संख्या कमी झाली आहे. परिणामी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड लोकांना उपलब्ध होत आहेत. मात्र कोरोनाची रुग्ण संख्या जशी वाढते, तसे बेड कमी उपलब्ध होतात आणि परिणामी मृत्यूचे प्रमाण वाढते हे गणित माहित असताना देखील लोक बेफिकीरपणे बाजारात फिरत आहेत.
इंदापूर तालुक्यातील कोरोना ची रुग्ण संख्या लक्षात घेता 15 जून रोजी ही रुग्णसंख्या फक्त 16 वर आली होती. 16 जून रोजी हीच रुग्ण संख्या 39 वर पोहोचली, तर 17 जून रोजी ही रुग्ण संख्या 40 वर पोहोचली आहे. 17 जून रोजीच्या प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या एकाच दिवशी तपासणी करणाऱ्यांची प्रमाण देखील वाढलेले दिसत आहे.
इंदापूर तालुक्यात 17 जून रोजी 1016 जणांची तपासणी करण्यात आली, तर तालुक्याबाहेरील विविध प्रयोगशाळांमध्ये 87 जणांची तपासणी झालेली आहे. यामध्ये तपासणीचे प्रमाण अधिक वाढत असले तरी, काहीजणांना सक्तीचे केले असल्यामुळे तसेच दुकानांमध्ये काम करणाऱ्यांना सक्तीचे केले असल्यामुळे तपासणीचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. परंतु एकूणच लक्षात घेता रुग्ण संख्या हळूहळू वाढत चालली आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आठ जून रोजी 18 रुग्णसंख्येवर आलेली रुग्णसंख्या हळूहळू वाढत आता 40 वर पोहोचली आहे.











