सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील पडस्थळ गावच्या झेंडेवस्तीवर तीन दिवसात दोन वेळा बिबट्या दिसल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. बिबट्याने एका महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न काल संध्याकाळी केल्याने ग्रामस्थ घाबरून गेले आहेत. कोरोना नंतर बिबट्याने भीती दाखवली असल्याने, कोरोनाचा लॉकडाउन कमी झाला तरी, बिबट्यामुळे बाहेर पडण्यास आता नागरिक तयार नाहीत.
7 जून रोजी पडस्थळ गावच्या झेंडे वस्तीवर अगोदर बिबट्या दिसला. मच्छीमाराला आणि एका पोलीस कर्मचाऱ्यास व त्याच्या पत्नीस घरामागे बिबट्या दिसला. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या तिथून निघून गेला. त्यानंतर झेंडेवस्तीवरील ग्रामस्थ त्या ठिकाणी आले. मात्र बिबट्याने पहिल्याच भेटीत सार्यांची भीतीने गाळण उडवली.
त्यानंतर काल 10 जून रोजी संध्याकाळी सहा साडेसहा वाजेच्या सुमारास जनावरे घरी घेऊन निघालेल्या सुनीता झेंडे या महिलेस बिबट्या दिसला. कालच छाया झेंडे या महिलेच्या अंगावर हल्ला करण्याचा त्याने प्रयत्न केला. या साऱ्या गोष्टी ऐकल्यानंतर वनविभागाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, या ठिकाणी पाहणी केली. त्यानंतर पायाचे ठसे पाहून, ते तपासणीसाठी पाठवले. दरम्यान हे बिबट्याचेच असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान पडस्थळ च्या सरपंच लता भिसे यांनी वनखात्याकडे झेंडे वस्तीवर पिंजरा लावण्याची मागणी केली. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी याठिकाणी कर्मचाऱ्यांना पाठवून पाहणी केली आहे. दरम्यान वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
या भागात फिरताना मोबाईलची गाणी चालू करून फिरावे. बिबट्या आढळल्यास फटाके फोडावेत. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे बाहेर कोणी झोपत नाही, मात्र अंगणात उघड्यावर कोणी झोपू नये, तसेच लहान मुलांना एकटे घराबाहेर सोडू नये असे आवाहन राहुल काळे यांनी केले.











