बारामती : महान्यूज लाईव्ह
काल रात्री बारामतीतील midc मधून ट्रक चोरीला गेला. योगायोगाने ट्रकला जीपीआरएस यंत्रणा लावलेली होती. त्याचा पाठलाग बारामती पोलीस करीत होते. परंतु चोरी करून निघालेला ट्रक गाडी कुणाला ओव्हर टेक करू देत नव्हता.. मोरगावमध्ये पोलिसानी बॅरिगेट लावले, ते तोडून ट्रक पुढे गेला. अशाप्रकारे पोलिसांनी वेळोवेळी व वेगवेगळ्या जागी लावलेले अडथळे तोडत ट्रक सासवडपर्यंत पुढे गेला परंतु पोलिसांनी अखेर तो ताब्यातच घेतला!
बारामतीपासुन जेजुरीपर्यंत काल संध्याकाळी झालेला हा थरार अनेकांनी पाहिला, परंतु बारामती, मोरगाव, जेजुरी आणि सासवडचे पोलिस देखील किती खंबीर आहेत आणि एखाद्या गंभीर गुन्ह्याच्या वेळी यांच्यामधील प्रसंगावधान कसे असते हे देखील अनेकांनी पाहिले.
बारामती व जेजुरी पोलिसांच्या संयुक्त कारवाई दरम्यान चोरीला गेलेला ट्रक ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या पथकाने व जेजुरी पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली. काल रात्री चोरी झालेल्या ट्रक व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेज देखील मिळाले आहेत. ते पाहिल्यानंतर हा थरार किती रोमांचक होता हे लक्षात येते.
चोरी केलेला हा ट्रक चोरट्याने बारामती कडून बारामती मोरगाव रस्त्याने वेगाने चालवला, यावेळी पोलिस या ट्रकचा पाठलाग करत होते. या ट्रकने एका पिकअपचा चुराडा केला. बारामती पोलीस पुढचे ट्रॅफिक बाजूला करण्याच्या सूचना देत होते. बारामती पोलिसांनी जेजुरी पोलिसांना माहिती सांगितली व जेजुरी पोलिसांनी जेजुरी शहरात मोरगाव रस्त्यावर अवजड वाहने उभी केले.
यात ट्रकचालकाने एका सलून दुकानचे नुकसान केले आणि हॉटेलच्या बाजूने ट्रक पुण्याच्या दिशेनं निघून गेला. यात सलून दुकान आणि हॉटेलचे नुकसान झाले. यानंतर ट्रक जेजुरीच्या पुढे सासवड रोडने पुढे गेला. पुढे ट्रक चालकाने वेग वाढवला आणि पुन्हा भरधाव वेगाने जाण्यास सुरुवात केली.
जेजुरी- सासवड रोडवर अरुंद पूल आहे, त्या ठिकाणी दोन अवजड वाहने आडवी उभी केली. आडवी वाहने पाहताच ड्रायव्हरने ट्रक चे स्पीड कमी करून क्लिनर साईडहुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मागून येणाऱ्या बारामती पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरला मोठ्या शिताफीने पकडले. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. बाबा नाझिरकर असे आरोपीचे नाव असून जेजुरी पोलिसांनी आरोपीला बारामती पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. नाझीरकर हा येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता. त्याने हा ट्रक चोरला. या घटनेचा पुढील तपास बारामती पोलिस करत आहेत.











