दौंड : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्हयातच नव्हे तर राज्यात देव-दानव युध्दाचा पारंपारीक खेळ म्हणून प्रसिध्द असलेली व दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडणारी दौंड तालुक्यातील कुसेगाव येथील भानोबा देवाची यात्रा यंदा कोरोना रोगाच्या पार्श्वभुमीवर रद्द करण्यात आल्याचे आदेश दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी दिले आहेत.
कुसेगाव येथील ग्रामदैवत श्री.भानोबा देवाची यात्रा यंदा 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी येत आहे. दरवर्षी या यात्रेत भानोबा देव व दानव यांच्या पारंपारीक युध्दाचा खेळ रंगला जातो, हा खेळ पाहण्यासाठी पुणे जिल्ह्यासह राज्यातून मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असतात. यंदा मात्र भाविकांना भानोबा देव – दानव युध्दाचा पारंपारीक खेळ पाहता येणार नाही.
कोरोना या संसर्गामुळे सर्वच यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. यामुळे दौंड तालुक्यातील सर्वच यात्रा रद्द करण्यात आल्या. नोव्हेंबर महिन्यातील पाटस व वरवंड येथील यात्रा ही रद्द करण्यात आली होती. यामुळे कुसेगाव येथील भानोबी देवाची यात्रा यंदा होणार की नाही असा संभ्रम भाविकांमध्ये होता, मात्र दौंडचे तहसीलदार संजय पाटील, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी कुसेगाव येथे यात्रा उत्सव कमिटी व ग्रामस्थांची बैठक घेतली.
या बैठकीत तहसीलदार पाटील यांनी यात्रा संदर्भात काय नियोजन आहे हे यात्रा उत्सव कमिटीकडून जाणुन घेतले. ग्रामदैवत श्री.भानोबा देव मंदीर खुले ठेवून गर्दी न करता फक्त देवाची पुजा व मंदीराच्या आतमधील धार्मिक कार्यक्रम करावेत. मंदीराच्या बाहेरील देव – दानव युध्दांचा पारंपारीक खेळ रद्द करावेत, बाहेरील व्यक्तींना आमंत्रित करू नये, प्रशासनाला सहकार्य करावे असे मत तहसीलदार संजय पाटील यांनी मांडले.
यात्रेच्या कालावधीत बाहेर गावातील नागरीकांची गर्दी होणार नाही याची दक्षता यात्रा उत्सव कमिटीने घ्यावी, तसेच पाटस – कुसेगाव, पडवी-कुसेगाव व सुपा – कुसेगाव या तीन्ही रस्त्यावर यात्रे दिवशी नाकाबंदी करण्यात येणार असून बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश दिला जाणार नाही. यात्रा उत्सव कमिटी व कुसेगाव ग्रामस्थांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसलीदार संजय पाटील आणि यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, कुसेगाव यात्रा कालावधीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, नियमांचे उल्लंगन केल्यास संबंधितांची गय केली जाणार नसून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा ही पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिला आहे.











