बेकरी व्यवसायात ऐश्वर्य आणणाऱ्या महेश साळुंखे यांची कहाणी
महान्यूज : दसरा स्पेशल
याचा व्हिडीओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज वर पाहू शकता
ही कहाणी आहे, गरिबीशी झगडणाऱ्या युवकाची.. आयुष्यात बदल या शब्दाला महत्व दिल्यानं घडलेल्या उद्योजकाची.. अन झटपट श्रीमंतीवर विश्वास न ठेवता कंपनीत वॉचमन म्हणून काम करून घराला हातभार लावत हळूहळू बेकरी व्यवसायात ऐश्वर्य मिळविणाऱ्या उद्योजकाची..! हो… ही कहाणी आहे, शून्यातून विश्व निर्माण करीत कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्य़ा तीन कंपन्यांचा प्रमुख असलेल्या महेश साळुंखे यांची..!
बारामती तालुक्यातील रुई हे गाव आज दिसते, तसे नव्हते.. तीस वर्षापूर्वी बारमाही दुष्काळी असलेल्या या गावात कुसळ देखील उगवायचं नाही, गावातील नोकरीचा मार्ग म्हणजे बारामतीत जाऊन हमाली करायची.. साळुंखे कुटुंबातील महेश यांचे वडीलही मापाडी होते. आई शेतमजूर म्हणून खुरपणी करायच्या..
अशा कुटुंबातून पुढे आलेल्या महेश यांनी सरकारी शाळेतच शिक्षण घेतले. आपल्या आईवडीलांचे कष्ट पाहवत नसलेल्या महेश यांनी लहानपणीच ही स्थिती बदलायचा निर्धार केला.. तेव्हापासून त्यांच्या आयुष्यात बदल हा शब्द कळीचा बनला..
चुलत्यांनी पाठबळ दिले आणि पदवीधर झालेल्या महेश यांनी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या चौकात ऐश्वर्या रसवंतीगृह सुरू केले. चौकसबुध्दी व काळाच्या दोन पावले पुढचा विचार करण्याचा दृष्टीकोन यातून येथे वाढलेल्या विद्यार्थी वर्ग व औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी चांगल्या बेकरीची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यातूनच ऐश्वर्या बेकरीचा जन्म झाला. सुरवातीला १० बाय १० च्या खोलीत व दोन कामगारांना घेऊन ऐश्वर्या बेकरी सुरू झाली. सतत नाविण्याचा शोध व स्वच्छतेवर प्रेम यामुळे बेकरीचे पदार्थ लवकरच नावारुपाला आले. बेकरीबद्दलचे सारे गैरसमज मोडीत काढताना हायजिनीक उत्पादने, एफडीआय प्रमाणित रंगांचा वापर व बेकरीत १०० हून अधिक पदार्थ ही वैशिष्ठ्ये कायम ठेवली. आज ३० हजार चौरस फूट क्षेत्रफळात तब्बल १५ कोटी खर्चून उभारलेल्या अत्याधुनिक यंत्रणेसह ऐश्वर्या बेकरी नव्हे तर उद्योग सुरू आहे. जवळपास ४०० कामगारांना नोकरी देणाऱ्या या बेकरीची उलाढाल ८ कोटींची आहे. पुण्यासह विविध भागांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या ऐश्वर्याच्या २२ शाखा सध्या सुरू आहेत.
एवढ्यावरच न थांबता महेश यांनी औद्योगिक कंपन्यांसाठी औद्योगिक केटरींग सुरू केले, ऐश्वर्या फूड अॅण्ड अलाईड नावाच्या या कंपनीला बारामती औद्योगिक वसाहतीतील ९ कंपन्यांनी कंत्राट दिलंय. आज दररोज ९ हजार कामगारांना त्यांच्या ऐश्वर्या अलाईड फूडस मधून आहार वेळेत पोचतो. २४ तास सुरू व कायम दक्ष असलेल्या या फूडस उद्योगात २४० कामगार काम करतात. सेंट्रलाईज्ड किचन ही संकल्पना महेश यांनी यशस्वी करून दाखवली. अर्थात कामगारांना पूर्ण स्वातंत्र्य, भक्कम पाठबळ व विश्वासाबरोबर कुटुंबियांचा पूर्ण पाठींबा यामुळे महेश यांची घौडदौड सध्या वेगात सुरू आहे.
याच्या जोडीला त्यांची पुण्यातही एमीनंत बेकिंग नावाची कंपनी आहे. ही मॉडर्न कॉन्स्पेक्ट वरती चालणारी एक वेगळी बेकरी आहे, त्याच्या 7 शाखा चालू केल्या असून त्याचाही विस्तार चालू आहे.
बेकरी व्यवसायातील हे ऐश्वर्य उभारताना कोणत्याही संकटांना न हारता त्यांना संधी मानणाऱ्या महेश यांचा आजवरचा प्रवास अनुकरणीय असाच आहे.










