देशात आणि महाराष्ट्रात हा बहुमान पटकावणारी ठरली एकमेव भाजीपाला रोपवाटिका; अत्याधुनिक तंत्रज्ञान व गुणवत्तेचा राष्ट्रीय गौरव
बारामती : कृषी तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात देशात अग्रगण्य नाव असलेल्या बारामतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचलित कृषी विज्ञान केंद्रांतर्गत कार्यरत असलेल्या भाजीपाला गुणवत्ता केंद्रातील अत्याधुनिक रोपवाटिकेने राष्ट्रीय पातळीवर ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत असलेल्या राष्ट्रीय बागवानी मंडळाकडून (National Horticulture Board – NHB, गुरगाव) या रोपवाटिकेला मानाचे ‘थ्री स्टार’ मानांकन देऊन गौरवण्यात आले आहे. अशा प्रकारचे मानांकन मिळवणारी ही महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील पहिली आणि एकमेव भाजीपाला रोपवाटिका ठरली आहे.
या मानांकनासाठी राष्ट्रीय बागवानी मंडळाच्या पुणे उपविभागाचे अधिकारी डॉ. सतेन्द्र सिंग, रोपवाटिका सल्लागार डॉ. टी. एस. अघोरा तसेच बारामतीच्या उपविभागीय कृषी अधिकारी सौ. रेश्मा जोशी व त्यांच्या संपूर्ण पथकाने प्रत्यक्ष भेट देऊन रोपवाटिकेतील पायाभूत सुविधा आणि उत्पादन पद्धतीची सखोल पाहणी केली. अत्यंत काटेकोर निकषांवर तपासणी पूर्ण झाल्यानंतर बारामतीच्या या रोपवाटिकेकडे हे उच्च मानांकन सुपूर्द करण्यात आले.
भाजीपाला गुणवत्ता केंद्रातील ही रोपवाटिका डच पद्धतीच्या अत्याधुनिक संरचनेमध्ये उभारलेली असून कुशल कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तिचे कामकाज चालते. यात आधुनिक बेंच सिस्टीम, नियंत्रित बीज उगवण कक्ष, फॅन व पॅड टाइप पॉलीहाऊस तसेच हार्डनिंग कक्ष यांसारख्या जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. रोपांच्या सशक्त वाढीसाठी जर्मनीतून आयात केलेले परलाइट व पीटमॉस वापरले जाते, तर रोपवाटिकेत वापरले जाणारे कोकोपीट हे आंतरराष्ट्रीय ‘RHP प्रमाणित’ आणि पूर्णपणे निर्जंतुकीकरण केलेले असते. यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार, निरोगी आणि उच्च उत्पादनक्षम रोपे मिळतात.
केवळ गुणवत्तापूर्ण रोपांची निर्मितीच नव्हे, तर शेतकरी सक्षमीकरणातही या केंद्राने भरीव योगदान दिले आहे. गेल्या सात वर्षांत या रोपवाटिकेमधून ३ कोटी ५० लाखांपेक्षा जास्त भाजीपाला रोपांची निर्मिती करून ती राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याशिवाय, महाराष्ट्रातील २०० पेक्षा अधिक रोपवाटिका चालकांना शास्त्रोक्त प्रशिक्षण देऊन रोपवाटिका उद्योगाला सक्षम दिशा देण्याचे मोठे काम या केंद्राने केले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख श्री. राजेंद्र पवार, विश्वस्त श्री. विष्णुपंत हिंगणे, श्री. विश्वजित वाबळे आणि कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. धीरज शिंदे यांनी संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या प्रकल्पाच्या यशामध्ये उद्यानविद्या विषयतज्ज्ञ श्री. यशवंत जगदाळे आणि श्री. विजय मदने यांच्या अभ्यासपूर्ण नियोजनाचे आणि सातत्यपूर्ण परिश्रमांचे मोलाचे योगदान राहिले.











