बारामती : स्वातंत्र्यलढ्यात सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांच्या हक्क, सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी देशभरात व्यापक लढा उभारण्याचा निर्धार ‘स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवार समिती’च्या (रजि.) राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला. प्रेस क्लब ऑफ इंडिया, नवी दिल्ली येथे पार पडलेल्या या अर्धवार्षिक बैठकीत संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निलेश कोठारी यांची, तर राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून कबीर तांबोळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष देशबंधू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस २१ राज्यांतील ४२ प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष द्विजेंद्र मोहन शर्मा, राष्ट्रीय महासचिव जितेंद्र रघुवंशी, कार्यकारी महासचिव चंद्रप्रकाश बाजपेई, राष्ट्रीय संघटन सचिव कपूर सिंह दलाल आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील गुजराती उपस्थित होते. देशभरातील सुमारे ५ कोटी स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकाऱ्यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी व्यापक जनसंपर्क मोहीम राबविण्याचा संकल्प यावेळी सोडण्यात आला.
संघटना सध्या २३ राज्यांमध्ये कार्यरत असून नव्या पिढीला जोडण्यासाठी मातृशक्ती आणि युवा मंचावर विशेष भर दिला जाणार आहे. गांधीवादी विचारांचा प्रसार, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचा इतिहास घराघरांत पोहोचवणे आणि पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात संघटनेचा पाया मजबूत केल्याबद्दल निलेश कोठारी यांचा विशेष सन्मान करून त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
या निवडीनंतर बोलताना निलेश कोठारी यांनी महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैनिक कुटुंबीयांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधले. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकाऱ्यांना अधिकृत ‘राष्ट्रीय वारसा’ घोषित करून ओळखपत्रे द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय उत्तराधिकारी कुटुंबांना मानधन, एसटी व रेल्वे प्रवास सवलत, ५ एकर शेतजमीन, राहण्यासाठी ५ गुंठे जागा अथवा सदनिका, घरपट्टी-पाणीपट्टी करमाफी, खाजगी रुग्णालयांत मोफत उपचार, शैक्षणिक शुल्क माफी, वसतिगृहात जागा आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याची मागणी त्यांनी लावून धरली.
तसेच स्वयंरोजगारासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा आग्रह त्यांनी धरला. या सर्व मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत शिष्टमंडळाची बैठक घडवून आणण्याची जबाबदारीही कोठारी यांच्यावर सोपवण्यात आली. बैठकीत मान्यवरांना नियुक्तीपत्रे व सन्मानपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला असून येत्या २६ ऑक्टोबर रोजी अमरकंटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्वातंत्र्यसैनिक संमेलनास देशभरातून उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.











