सहयोग निवासस्थानी आज खलबतं: सुनेत्रा पवार यांच्या भेटीकडे ऊस उत्पादक सभासद व इच्छुकांचे लक्ष; नव्या-जुन्यांचा मेळ की मोठा फेरबदल?
बारामती : राज्यात सातत्याने सर्वाधिक ऊस दर देऊन कार्यक्षम व्यवस्थापनाचा लौकिक राखणाऱ्या श्री छत्रपती सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.
कारखान्यावरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व अबाधित राखण्यासाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याच्या दृष्टीने आज बारामतीतील ‘सहयोग’ निवासस्थानी दुपारी साडेबारा वाजल्यापासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते आणि ऊस उत्पादक सभासदांशी थेट संवाद साधणार आहेत. या बैठकीत त्या नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवणार की नव्या-जुन्यांचा सुवर्णमध्य साधणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले गेले आहे.
दरम्यान, उमेदवार निश्चितीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत कार्यकर्त्यांमधून मोठे बदलाचे वारे वाहत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशेषतः जिरायती भागातून नव्या आणि आश्वासक चेहऱ्यांना संधी दिली जावी, असा ठाम सूर उमटत आहे. त्यातच तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी ज्या ठेकेदार प्रवृत्तीला आणि ‘मलिदा गँग’ला सत्तेच्या वर्तुळापासून जाणीवपूर्वक लांब ठेवले होते, त्यांना वहिनींनीही (उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार) उमेदवारीपासून पूर्णपणे बाजूला ठेवावे, अशी रोखठोक मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
ज्या जुन्या पदाधिकाऱ्यांना आतापर्यंत संधी मिळाली आहे त्यांना विश्रांती देऊन पक्षासाठी प्रामाणिकपणे झटणाऱ्या नव्या फळीला रिंगणात उतरावे, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. सोमेश्वरचे उत्तम व्यवस्थापन आणि उच्चांकी ऊस दराची परंपरा पाहता आगामी संचालक मंडळात संधी मिळणे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जात आहे. ‘सहयोग’ निवासस्थानी होणाऱ्या आजच्या थेट मंथनातून सामान्य सभासद व कार्यकर्त्यांचा रोख समजून घेतल्यानंतरच अंतिम नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याने, सोमेश्वरच्या आखाड्यात कोणाची वर्णी लागते आणि कोणाचा पत्ता कट होतो, याचा फैसला या बैठकीतून स्पष्ट होणार आहे.











