उपेक्षेच्या चौकटीबाहेर पडत यवतच्या तृतीयपंथी समाजाचा समाजप्रबोधनाचा जागर
राजेंद्र झेंडे, दौंड: समाजाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसा दूर समजल्या जाणाऱ्या तृतीयपंथी समाजाने सामाजिक प्रबोधनाची धुरा आपल्या खांद्यावर घेत यवत येथे एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. गौरी-गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘मुलगी वाचवा, स्त्रीभ्रूणहत्या थांबवा’ हा संवेदनशील सामाजिक संदेश देत यवत येथील तृतीयपंथी बांधवांनी उत्सवाला केवळ धार्मिक स्वरूप न देता त्याला समाजजागृतीचे व्यासपीठ बनविले आहे. त्यांच्या या उपक्रमातून उत्सवाच्या माध्यमातूनही समाजपरिवर्तनाची बीजे रुजविता येतात, हे अधोरेखित झाले आहे.
यवत येथील तृतीयपंथी वाड्यात दरवर्षी सामाजिक विषयांवर आधारित देखावे सादर करण्याची परंपरा आहे. गेल्या ३५ वर्षांपासून येथे गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात असून, तब्बल चार पिढ्यांपासून तृतीयपंथी समाज आणि ग्रामस्थ यांच्यात स्नेह, सलोखा आणि आपुलकीचे संबंध जपले गेले आहेत.
वर्षभरातील विविध सण-उत्सवांमध्ये ग्रामस्थही उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याने हा वाडा सामाजिक एकोप्याचेही उदाहरण ठरत आहे.
यंदा ‘दीपा गुरु रंजिता नायक’ यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीभ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भलिंग निदानासारख्या गंभीर सामाजिक समस्येवर आधारित देखावा साकारण्यात आला आहे.
काही महिन्यांपूर्वी केडगाव परिसरात स्त्रीभ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भलिंग निदानाचे प्रकरण उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सामाजिक भान निर्माण करण्याची गरज अधोरेखित करत या देखाव्यातून ‘मुलगी ही ओझे नसून समाजाची शक्ती आहे’, असा संदेश देण्यात आला आहे. अशा प्रकारच्या सामाजिक गुन्ह्यांना केवळ कायद्याच्या माध्यमातून आळा घालण्याबरोबरच समाजानेही जागरूक आणि संवेदनशील होणे आवश्यक असल्याचे या उपक्रमातून सांगण्यात आले आहे.
गौरी पूजनाच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे यांच्या हस्ते आरती व महापूजा पार पडली. यावेळी तृतीयपंथी समाजाच्या मालक रंजिता नायक, दीपा गुरु, दीपक महाराज कदम (न्हावरा), राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव कांचन ढमाले, खामगावचे माजी सरपंच योगेश मदने, युवा उद्योजक सागर खुटवड तसेच तृतीयपंथी शिष्य परिवारातील वैशाली, अर्चना, अप्सरा, पूजा, किरण, लखन, विकी, कुमार, विजया, भार्गवी आदी उपस्थित होते.
धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करण्याचा हा प्रयत्न विशेष लक्षवेधी ठरला आहे. ‘उत्सव आपला, सामाजिक जबाबदारीही आपलीच’ ही भूमिका प्रत्यक्ष कृतीतून मांडत यवतच्या तृतीयपंथी समाजाने समाजप्रबोधनाची नवी वाट दाखवली आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ एका वाड्यापुरता मर्यादित न राहता सामाजिक संवेदनशीलतेचा आणि समतेचा संदेश देणारा ठरला आहे.
तृतीयपंथी समाजाचा उपक्रम आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी — वैशाली नागवडे
एकीकडे गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषण, डीजे आणि इतर विषयांवर चर्चा होत असताना यवत येथील तृतीयपंथी समाजाने गणेशोत्सवाला सामाजिक प्रगती आणि समाजप्रबोधनाची दिशा दिली आहे. उपेक्षित समजल्या जाणाऱ्या समाजघटकाने स्त्रीभ्रूणहत्या सारख्या गंभीर विषयावर जनजागृतीचा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे. त्यांचा हा उपक्रम आजच्या तरुण पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.











