बारामती : रक्षाबंधनाचा सण म्हणजे भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा दिवस. मात्र, देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या हजारो जवानांना या सणाच्या दिवशी आपल्या कुटुंबीयांची, बहिणीची आठवण येत असते. याच भावनेची जाणीव ठेवत विद्या प्रतिष्ठानच्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल (सी.बी.एस.ई.) च्या इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या वीर जवानांसाठी प्रेमाने राख्या पाठवून रक्षाबंधनाचा सण एका अनोख्या पद्धतीने साजरा केला.
देशाच्या सीमेवर ऊन, वारा, पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या मनगटावर आपल्या हाताने बांधलेली राखी नसली, तरी आपल्या प्रेमाचा धागा त्यांच्या मनगटापर्यंत पोहोचावा, या भावनेतून विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने राख्या तयार केल्या. राख्यांसोबत विद्यार्थ्यांनी जवानांना हृदयस्पर्शी पत्रे, कविता आणि शुभेच्छापत्रेही पाठवली आहेत.
‘तुम्ही सीमेवर आहात म्हणून आम्ही आमच्या घरात आणि शाळेत सुरक्षित आहोत’, ‘तुम्ही आमचे खरे हिरो आहात’, अशा भावना व्यक्त करणारे संदेश या पत्रांमधून विद्यार्थ्यांनी जवानांपर्यंत पोहोचवले आहेत.
“आमचे सैनिक भाऊ सीमेवर देशाचे रक्षण करत आहेत, म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. त्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीची आठवण येऊ नये आणि आमच्या प्रेमाची जाणीव व्हावी, म्हणून आम्ही ही राखी पाठवली आहे,” अशी निरागस भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सर्व राख्या, पत्रे आणि शुभेच्छापत्रे एकत्रित करून विशेष पार्सलद्वारे मुख्य टपाल कार्यालयातून थेट जवानांपर्यंत पाठविण्यात आली. त्यामुळे शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये तयार झालेले हे प्रेमाचे धागे आता देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या मनगटावर दिसणार आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ रक्षाबंधनाचा अर्थ समजला नाही, तर देशासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता, आदर आणि देशप्रेमाची भावनाही रुजली. एका छोट्याशा राखीच्या माध्यमातून चिमुकल्या हातांनी देशाच्या रक्षणासाठी उभ्या असलेल्या वीर जवानांना दिलेला हा प्रेमाचा संदेश निश्चितच भावणारा ठरला.
विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आणि सैनिकांबद्दल आदर निर्माण व्हावा, तसेच जवानांच्या त्यागाची जाणीव पुढील पिढीला व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांनी प्रेमाने पाठवलेल्या या राख्या आणि शुभेच्छांमुळे सीमेवर तैनात असलेल्या जवानांचे मनोबल निश्चितच वाढेल. देशासाठी लढणाऱ्या वीरांच्या त्यागाची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणे हीच या उपक्रमाची खरी फलश्रुती आहे, असा विश्वास शाळेच्या प्राचार्या डॉ. सरिता शिंदे यांनी व्यक्त केला.











