रायगड : केंद्रीय वस्तू व सेवा कर (CGST) विभागातील लाचखोरीविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) रायगडमध्ये धडक मोहीम राबवून खळबळ उडवून दिली आहे. दगडखाण उद्योगाशी संबंधित जीएसटी व रॉयल्टीचा वाद मिटवण्यासाठी तब्बल ४० लाख रुपयांची लाच उकळताना सीजीएसटीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एका खासगी मध्यस्थाला सीबीआयने बेड्या ठोकल्या.
दीड कोटींची खंडणी, ४० लाखांवर मिटवला व्यवहार
तक्रारदाराच्या दगड उत्खनन व्यवसायाशी निगडित जीएसटी आणि रॉयल्टीचे प्रलंबित प्रकरण परस्पर निकाली काढण्याच्या बदल्यात सुरुवातीला १.५० कोटी रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती ही रक्कम ४० लाख रुपयांवर निश्चित झाली. कारवाईच्या भीतीने अधिकाऱ्यांनी स्वतः थेट पैसे न घेता, नरेंद्र राजपूत या खासगी दलालामार्फत रक्कम पोहोचवण्याची अट घातली होती.
सीबीआयचा सापळा आणि रंगेहाथ अटक
सीबीआयच्या पथकाने २७ ऑगस्ट रोजी व्यूहरचना आखून सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ४० लाख रुपयांची रोकड स्वीकारताना दलाल नरेंद्र राजपूत याला रंगेहाथ पकडण्यात आले. राजपूतच्या चौकशीत आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सीजीएसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग निष्पन्न होताच दोघांनाही तत्काळ ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी विनय कुमार कांठेती – अतिरिक्त आयुक्त, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (CBIC), राकेश कुमार सिन्हा – अधीक्षक, CGST, रायगड, नरेंद्र राजपूत – खासगी मध्यस्थ (लाचेची रक्कम स्वीकारणारा) असे असून त्यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात 43 लाखांची रोकड व 90 लाखांची दागिने जप्त करण्यात आले आहेत.
आरोपींना अटक केल्यानंतर सीबीआयने त्यांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर एकाच वेळी छापे टाकले. या झडतीदरम्यान तपास यंत्रणेच्या हाती ४३ लाख रुपयांची बेहिशोबी रोकड आणि सुमारे ९० लाख रुपये मूल्याचे सोन्या-चांदीचे दागिने लागले. ही सर्व संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या लाचखोरीच्या रॅकेटमध्ये विभागातील अन्य काही वरिष्ठ अधिकारी किंवा मध्यस्थांचा समावेश आहे का, याचा सखोल तपास आता सीबीआयकडून केला जात आहे.










