पिंपरी-चिंचवड : माहेरच्या वडिलोपार्जित संपत्तीतून हिस्सा आणण्यासाठी विवाहितेवर दबाव टाकत तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार वाकड परिसरात समोर आला आहे. या त्रासाला कंटाळून ४२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना २७ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. या प्रकरणी वाकड पोलिसांनी महिलेच्या पतीसह सासरच्या चार जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
शिल्पा सचिन गवारे (वय ४२, रा. इशान सोसायटी, वाकड) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत तिचे बंधू संतोष गुलाब कलाटे (वय ४७) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पती सचिन उत्तम गवारे, सासरे उत्तम गवारे, सासू संजीवनी गवारे आणि दीर संदीप गवारे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शिल्पा यांचा विवाह २००९ मध्ये सचिन गवारे यांच्याशी झाला होता. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. विवाहानंतर त्या पती आणि सासरच्या मंडळींसोबत वाकड येथील इशान सोसायटीमध्ये राहत होत्या. मात्र, कालांतराने शिल्पा यांना सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. माहेरच्या वडिलोपार्जित मालमत्तेत आपला हिस्सा मागून घेण्यासाठी दबाव टाकला जात होता. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करून हिस्सा आणावा, असा तगादा त्यांच्यामागे लावण्यात आल्याचे पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
संपत्तीच्या मुद्द्यावरून वारंवार होणारा मानसिक त्रास तसेच शारीरिक छळ यामुळे शिल्पा या तणावाखाली होत्या, असा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. अखेर या त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी पाठवण्यात आला.
दरम्यान, मृत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, छळ आणि मारहाणीच्या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करीत असून, शिल्पा यांच्या आत्महत्येमागील नेमकी परिस्थिती, त्यांच्यावर झालेल्या कथित छळाचे स्वरूप आणि संपत्तीच्या वादातील अन्य बाबींचा तपास केला जात आहे.










