बारामती : महान्यूज लाईव्ह
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जपलेली जनतेशी थेट संवाद साधण्याची परंपरा युवा नेते जय पवार यांच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न असून आज शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस भवन, कसबा, बारामती येथे दुपारी १२ वाजता जय पवार यांचा जनता दरबार होणार आहे. येथे ते नागरिकांच्या विविध समस्या ते जाणून घेऊन त्या समस्यांचे निराकरण ते करणार आहेत.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान जय पवार यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन शेतकरी, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधला होता. त्यांच्या या जनसंपर्कामुळे बारामतीच्या राजकारणात जय पवार अधिक सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली. कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याने संवाद साधणे, त्यांच्या भावना जाणून घेणे आणि संघटन मजबूत करण्यावर भर देणे या त्यांच्या कार्यशैलीत अजितदादांच्या लोकाभिमुख राजकारणाची झलक दिसत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान दर गुरुवारी जनता दरबार घेण्याची घोषणा जय पवार यांनी पोटनिवडणुकीच्या काळात केली होती. मात्र त्यानंतर काही आठवडे या उपक्रमात खंड पडला होता. आता पुन्हा जनता दरबार सुरू होत असल्याने त्याकडे बारामतीकरांचे विशेष लक्ष लागले आहे. बारामतीच्या राजकारणात जय पवार यांची सक्रियता वाढत असताना त्यांच्या कार्यशैलीत अजितदादांच्या जनतेशी जोडलेल्या राजकारणाची छाप दिसून येत असल्याची चर्चा आहे. जनतेचे प्रश्न ऐकून घेणे, कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणे आणि संघटन मजबूत करण्यावर भर देणे या माध्यमातून ते स्वतःची राजकीय वाटचालीस आकार देत असल्याचे दिसून येत आहे.











