डॉ. महेश घोळवे : महान्यूज स्पोर्ट्स अपडेट
भारतीय क्रिकेट इतिहासामधील दोन महान कर्णधार आज आयपीएलच्या निमित्ताने आमने सामने उभे ठाकणार आहेत. दोघांचीही या आयपीएल मधील कामगिरी कभी खुशी कभी गम याप्रमाणे झाली आहे. एखादा विजय मिळाला की लगेच पुढच्या सामन्यात पराभव होणे हे दोघांनी यंदाच्या मोसमात अनुभवले आहे.
गुणतालिकेत बंगळूर सहा गुणांसह पाचव्या स्थानावर असून चेन्नई चार गुणांसह सहाव्या स्थानावर विराजमान आहे. आयपीएल मध्ये आतापर्यंत 23 वेळा दोघे आमनेसामने आले असून 15 सामन्यात चेन्नई विजयी झाले आहे तर आठ सामन्यात बंगळूर जिंकले आहे.
बंगळूरची फलंदाजीची मुख्य मदार कर्णधार विराट कोहली व ए बी डिव्हिलियर्स यांच्या वरती अवलंबून आहे. चेन्नईची आतापर्यंतची फलंदाजीची स्थिती दोलायमान राहिली आहे.
कोलकत्ता विरुद्ध हाती असलेला विजय तळातील फलंदाजांच्या हाराकिरी मुळे हातून निसटला होता ही बाब चेन्नईच्या चाहत्यांच्या मनावर चांगलीच घाव करणारी ठरली होती. त्यामुळे चेन्नईच्या मधल्या फळीत बदल होणार हे निश्चित मानले जात आहे.











