बारामती : महान्यूज लाईव्ह
महाविकासआघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आले आणि बारामतीच्या विकासकामांचा दुष्काळच संपला. गेली नऊ महिने कोरोनाच्या महामारीच्या काळातही बारामतीत वेगाने कामे सुरू आहेत. बारामतीतील अत्याधुनिक प्रस्तावित बसस्थानक, पोलिस मुख्यालय, शिवसृष्टी, वन उद्यान, पोलिस वसाहत, चिंकारा उद्यान, अॅडव्हेंचर पार्क, निरा कालवा दुरुस्ती, प्रस्तावित टाऊन हॉल, पाणी साठवण तलाव, रस्ते रुंदीकरण, २२ दु्ष्काळी गावांच्या पाणी योजना अशा अनेकविध योजनांना निधी मंजूर करण्यात आला असून ही कामे प्रक्रिया स्तरावर आहेत. सध्या सुरू असलेल्या कामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील कामे वेळेत व चांगली होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
अजितदादांनी केलेल्या पाहणीचा व्हिडीओ येथे पहा किंवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहा.
आठवड्यातून दोन दिवस बारामतीसाठी देणाऱ्या अजितदादांनी प्रत्येक आठवड्यात बारामतीच्या कामांचा आढावा घेण्याचे ठरवले असल्याने अधिकारीही सक्रीय आहेत. आज अजितदादांनी निरा कालवा दुरुस्ती, गुनवडी शिवाजी चौक रुंदीकरणासह विविध कामांची पाहणी करीत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. अजितदादा आज पूर्ण शहरात फिरून विकासकामांची पाहणी करताना व माहिती घेताना दिसल्याने नागरिकांनी देखील गर्दी केली होती.











