इंदापूर : महान्यूज लाईव्ह
ती पाच वर्षाची चिमुकली आराध्या खूपच गोंडस हो… पण तिच्या निरोगी आयुष्याला दृष्ट लागली.. पोटातील वेदना संपेनात म्हणून दवाखान्यात दाखवले, तर हृदयाशेजारी एक गाठ असल्याचे निदान झाले..आणि तिच्या आईबापाच्या काळजाचा ठोका चुकला.. वडील गवंडीकाम करून कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात…कुठून आणणार एवढे पैसे.. गाठ फुटली, तर फक्त तीन दिवसांचे आयुष्य तिच्या वाट्याला येईल असे सांगितल्यावर तर पायाखालची वाळूच सरकली.. मात्र काळरात्रीत देखील उष-काल दडलेला असतो.. हे कुटुंब ज्यांच्या घरात भाड्याने राहते, तेथील घरमालकांनी एका देवदूताला फक्त चहाचे निमंत्रण दिले आणि आऱाध्याच्या आयुष्याची गाठ निरामय जीवनासाठी अगदी फिट्ट झाली..!
जिच्या शस्त्रक्रियेसाठी दहा वर्षे कंबरतोड मेहनत करूनही पैसे जुळले नसते, ते घरमालकाच्या केवळ एका चहाच्या कपाने झाल्याने संतोष भोंग यांचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे, कारण त्यांची लाडकी आराध्या आता निरामय जीवन जगणार आहे आणि याला निमित्त ठरलेल्या देवदूतांमध्ये आहेत, इंदापूरचे भूमीपूत्र एनएसयुआय संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष अॅड. विजयसिंह चौधरी, युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक प्रशांत सिताप, अध्यक्ष अस्लम शेख आणि ज्यांच्या घरातून या समाजकार्याची सुरवात झाली, ते घरमालकनितीन पासगे व सुधीर पासगे..! खरेतर देवदूत हे देवदूतच असतात…प्रसिध्द लेखक तन्वीर सिद्दीकी यांच्या मते सगळेच देव आभाळात नसतात. ते जमीनीवर दुर्बलांच्या मदतीसाठी कायम सदैव तत्पर असतात.
पाच वर्षाच्या आराध्या संतोष भोंग हिच्यावर नुकतीच भारती विद्यापीठातील हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली. त्यासाठी मात्र एक कप चहाचे निमित्त ठरले. सुधीर पासगे यांनी प्रशांत सिताप व त्यांच्या सहकाऱ्यांना चहासाठी बोलवले होते. चहा पिताना सहज शेजारच्या भोंग कुटुंबातील संकटाची बोलता बोलता सिताप यांना सुधीर यांनी कल्पना दिली आणि लागलीच तिची फाईल मागवून सिताप यांनी अॅड. चौधरी यांना संपर्क केला. आराध्याला असलेल्या या आजाराची कल्पना दिली. अॅड. चौधरी यांनी लागलीच भारती विद्यापीठातील संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधला आणि मोफत शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला. नुकतीच ही शस्त्रक्रिया झाली. आता आराध्याची प्रकृती उत्तम आहे..!











