बारामती : महान्यूज लाईव्ह
देशातील खाद्यतेल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी नवे बळ दिले आहे. कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव कडेपठार परिसरातील शेतकऱ्यांनी नव्याने संशोधित करण्यात आलेल्या SUNH-1 (Tilhan Tech-1) या सूर्यफूल वाणाची यशस्वी लागवड करून विक्रमी उत्पादन घेतले असून, तेलबिया उत्पादन क्षेत्रात ही एक महत्त्वाची आणि आशादायी क्रांती मानली जात आहे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचलित कृषी विज्ञान केंद्रामार्फत ICAR च्या CFLD on Oilseeds कार्यक्रमांतर्गत जळगाव कडेपठार, जळगाव सुपे, काऱ्हाटी, देऊळगाव रसाळ आणि नाटंबी या गावांमध्ये ५० एकर क्षेत्रावर सूर्यफूल पिकाची प्रात्यक्षिके घेण्यात आली. या प्रात्यक्षिकांसाठी भारतीय तेलबिया संशोधन संस्था (IIOR), हैदराबाद यांनी विकसित केलेला SUNH-1 हा सुधारित संकरित वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला.
या प्रकल्पात सहभागी शेतकऱ्यांनी सरासरी हेक्टरी २० क्विंटल उत्पादन मिळविले. विशेष म्हणजे जळगाव कडेपठार येथील प्रगतशील शेतकरी पांडुरंग मारुती वाबळे यांनी उत्कृष्ट पीक व्यवस्थापनाच्या जोरावर हेक्टरी तब्बल २७.०५ क्विंटल उत्पादन घेऊन आदर्श निर्माण केला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सूर्यफूल पीक उत्पादन स्पर्धेत त्यांना पुणे जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळाला असून ते ४० हजार रुपयांच्या पुरस्कारासाठी पात्र ठरले आहेत.
कृषी तज्ज्ञांच्या मते, देशात तेलबिया पिकांचे उत्पादन वाढविण्याची मोठी गरज आहे. अशा परिस्थितीत कमी कालावधीत परिपक्व होणारा, अधिक तेलांश असलेला आणि बदलत्या हवामानालाही तोंड देणारा SUNH-1 हा वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. या वाणामध्ये ४२ ते ४५ टक्के तेलांश असून डाऊनी मिल्ड्यू आणि लीफहॉपरसारख्या प्रमुख रोग-किडींविरुद्ध तुलनेने अधिक सहनशीलता आहे.
कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे बारामती तालुक्यात सूर्यफूल उत्पादनाचा नवा आदर्श निर्माण झाला असून, भविष्यात तेलबिया उत्पादन वाढीसाठी हा प्रयोग राज्यातील इतर भागांसाठीही दिशादर्शक ठरणार असल्याचे मत कृषी क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
SUNH-1 (Tilhan Tech-1) वाणाची वैशिष्ट्ये
पिकण्याचा कालावधी : ९० ते १०० दिवस. सरासरी उत्पादन क्षमता : २० क्विंटल प्रति हेक्टर. तेलाचे प्रमाण : ४२ ते ४५ टक्के. हेक्टरी तेल उत्पादन क्षमता : सुमारे ७४६ किलो. प्रमुख रोग व किडींना तुलनेने अधिक सहनशील. बदलत्या हवामानातही चांगली उत्पादनक्षमता. एकंदरीत तेलबिया उत्पादन वाढविण्याच्या राष्ट्रीय मोहिमेला बारामतीच्या शेतकऱ्यांनी दिलेली ही भक्कम साथ असून, सूर्यफूल लागवडीच्या क्षेत्रात हा प्रयोग नवी दिशा देणारा ठरला आहे.











