बारामती : महान्यूज लाईव्ह
अजितदादांप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी बारामती तालुक्यातील युवकांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. बारामती ते मुंबई मंत्रालय अशी सायकल यात्रा आज, रविवारी (दि. १५ फेब्रुवारी रोजी) पहाटे ३ वाजता सुरू करण्यात आली. ही यात्रा सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी रोजी) दुपारी मंत्रालय येथे पोहोचणार आहे.
दादांनी सार्वजनिक जीवनात केलेल्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा जिवंत ठेवण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ‘एक बारामतीकर’ म्हणून भावनिक नात्याने जोडलेल्या या नागरिकांनी सुमारे शेकडो किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. पहाटेच्या शांत वातावरणात सुरू झालेल्या या यात्रेला स्थानिक नागरिकांनी शुभेच्छा देत निरोप दिला.
या सायकल यात्रेत निलेश उत्तमराव घोडके, शंकर गुलाबराव माळवे, अक्षय आबासो कुदळे, सागर तानाजी नाळे, अविनाश अर्जुनराव भोसले, नवनाथ विठ्ठल भापकर, गोरख शिरसागर आणि अतुल प्रकाश लोणकर (सर्व रा. ता. बारामती) सहभागी झाले आहेत. दादांप्रती असलेली निष्ठा आणि भावना कृतीतून व्यक्त करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सहभागी युवकांनी सांगितले.
ही यात्रा केवळ श्रद्धांजलीपुरती मर्यादित नसून समाजात एकात्मता, प्रेरणा आणि कृतज्ञतेचा संदेश देणारी ठरत आहे. बारामतीकरांच्या वतीने या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत असून, दादांच्या कार्याची आठवण आणि विचारांची परंपरा पुढे नेण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात येत आहे.











