राजेंद्र झेंडे,महान्युज लाईव्ह
दौंड : शिव -फुले – शाहू – आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज ते संत गाडगेमहाराजांपर्यंत भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेवर पहार करणाऱ्या संतांनी केलेल्या प्रबोधनाचा वारसा लाभलेला या महाराष्ट्रात धार्मिकतेच्या नावाखाली भोंदूगिरीला उधाण आले आहे.
रोज नवनवे महाराज जन्म घेत आहेत. याच भोंदूगिरीचे मोठे प्रस्थ सध्या दौंड तालुक्यात वाढू लागले आहे. दौंड तालुक्यातील पाटस, वरवंड, लिंगाळी, दौंडच्या काही गावांमध्ये तथाकथित भोंदू महाराज आणि देव ऋषींची संख्या वाढू लागली आहे. त्यातच सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी आणि राजकीय नेत्यांच्या दरबारी जाण्याऐवजी या तथाकथित भोंदू महाराजांच्या पायावर लोटांगण घालू लागले आहेत.
पाटस, वरवंड, केडगाव, कुरकुंभ, खडकी , लिंगाळी या परिसरातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या काही उमेदवारांनी पाटस परिसरातील भोंदू महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी रांग लावली आहे. या महाराजांकडे हात दाखवत मी निवडणुकीला उभे राहू का ? मला तिकीट मिळेल का ? मी निवडून येईल का? माझ्या बायकोला तिकडे मिळेल का ? उमेदवार अर्ज कोणत्या तारखेला , कोणत्या वेळेत भरू ? चांगला मुहूर्त कधी आहे अशा अनेक समस्या ते इच्छुक उमेदवार या महाराजांच्या समोर मांडत आहेत.
मग हे महाराज गालात स्मित हास्य करत, हात बघत , चेहऱ्याकडे बघत अमुक अमुक पक्षाकडे जावा त्यांच्याकडे तुम्हाला तिकीट मिळेल, अमुक अमुक तारखेला अमुक अमुक वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करा, मग तुम्ही नक्की विजयी होणार! आमचा अंदाज कधी चुकत नाही. आमचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. पण निवडणूक होईपर्यंत न चुकता दर गुरुवारी माझ्या म्हणजेच देवाच्या दर्शनाला न चुकता यायचं!
बरं आता या इच्छुक उमेदवारांमध्ये महिला उमेदवारही मागे नाहीत. त्या तर सगळ्यांच्या पुढे आहेत. आता विशेष म्हणजे निवडणुकीत आपल्या विरोधात उभे राहणाऱ्या उमेदवारांचा काटा कसा काढायचा त्यासाठी काय करावे लागेल? कसे नियोजन करावे लागेल? याचेही भविष्य या महाराजांच्या समोर पाहिले जाते. बरं हे इच्छुक उमेदवार अशिक्षित नाही बरंका? शिक्षित आहेत. आर्थिक सक्षम आहेत. सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही पक्षाचे पण आहेत.
मागील पाच-सहा दिवसांपासून हे चित्र येता जाता अनेक मतदारांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे रोज या महाराजांच्या समोर आणि मंदिरात एवढी गर्दी का असते? असा प्रश्न त्यांना पडतो, मात्र राजकीय नेत्यांच्या मर्जी शिवाय उमेदवारीचे तिकीट मिळणार नाही हे मात्र नक्की असले तरी या आपल्या राजकीय आजी माजी लोकप्रतिनिधी आणि नेत्यांपेक्षा सध्या इच्छुक उमेदवारांनी तथाकथित भोंदू महाराजांना महत्त्व देण्यास आणि त्यांना पसंती देण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र पाटस परिसरात पाहायला मिळत आहे.










