बारामती : महान्यूज लाईव्ह
नटराज नाट्य कला मंडळ, बारामती यांच्यावतीने सादर करण्यात येणारे पुरस्कारप्राप्त ‘कर्ण’ हे नाटक मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या नाट्य रतन फेस्टिव्हलमध्ये सादर होणार आहे. हा विशेष नाट्यप्रयोग रविवार, 28 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8.30 वाजता माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.
नाट्य रसिकांसाठी पर्वणी ठरणारा नाट्य रतन फेस्टिव्हल हा 25 ते 28 डिसेंबर 2025 या कालावधीत मुंबईत पार पडत असून, या फेस्टिव्हलमध्ये राज्यभरातील दर्जेदार व आशयघन नाट्यप्रयोगांचा समावेश करण्यात आला आहे. महाभारतातील अत्यंत प्रभावी व संघर्षशील व्यक्तिमत्त्व असलेल्या कर्णाच्या जीवनप्रवासावर आधारित ‘कर्ण’ या नाटकाने यापूर्वी अनेक नाट्यप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे.
या नाटकाने 64 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावला असून, अभिनय, दिग्दर्शन, संवाद व एकूण सादरीकरणासाठी नाटकाला विशेष प्रशंसा मिळाली आहे. सशक्त संवाद, प्रभावी अभिनय, नेपथ्य व संगीत यांच्या जोरावर ‘कर्ण’ हे नाटक कर्णाच्या त्याग, शौर्य, आत्मसंघर्ष आणि नियतीशी चाललेल्या लढ्याचे प्रभावी दर्शन घडवते.
नटराज नाट्य कला मंडळ, बारामती हे सातत्याने दर्जेदार नाट्यनिर्मितीसाठी ओळखले जात असून, त्यांच्या या नाटकाला रसिक व समीक्षकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. मुंबईतील नाट्यप्रेमींनी या पुरस्कारप्राप्त नाट्यप्रयोगाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.











