बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीच्या आरोग्य क्षेत्रात काल पुन्हा अशी घडली, जी एक लाखात दहा जणांच्या बाबतीत घडते.. बाळाची वार गर्भाशयात घुसलेली..रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात चाललेला आणि रक्तदाब कमी होत चाललेला..अशा गंभीर अवस्थेतून आईला वाचविण्याचा यशस्वी प्रयत्न येथील देवदूतांनी केला. दोन दिवसांपूर्वी डॉ. सौरभ मुथा व त्यांच्या सहकाऱ्यांनी बाळाने गिळलेले दोन रुपयांचे नाणे यशस्वीरित्या बाहेर काढले, तसेच काल रात्री स्त्रीरोगतज्ज्ञ व भूलतज्ज्ञांनी एका आईला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.
१ ऑक्टोबर रोजी दुपारी महिला शासकीय रुग्णालयात एक सिझेरियनची शस्त्रक्रिया सुरू होती. एकाच वेळी दोन टेबलवर दोन वेगवेगळ्या गर्भवतींची नऊ महिन्याच्या त्रासातून सुटका होऊन अपत्यप्राप्ती होणार असल्याने घालमेल सुरू होती. अशातच एक सिझेरियन यशस्वीरित्या संपले आणि दुसरे सिझेरियन सुरू असतानाच बाळ बाहेर आल्यानंतर अचानक रक्तस्त्राव सुरू झाला. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात सुरू होता आणि रक्तदाब हळूहळू खाली येत चालला होता.
अशी स्थिती दिसताच सारे स्त्रीरोगतज्ञ, भूलतज्ज्ञांसह सारेजण त्या टेबलवर केंद्रीत झाले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापू भोई, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजेश कोकरे, डॉ. शुभांगी वाघमोडे, भूलतज्ज्ञ डॉ. सुजीत अडसूळ, रुग्णालयातील डॉक्टर गायकवाड व त्यांच्या पथकाने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले, तेव्हा बाळाची वार ही गर्भाशयात घुसल्याचे दिसून आले. अशी घटना वैद्यकीय शास्त्रातील अनुभवानुसार लाख रुग्णांमागे १० जणांबाबतीत होते..
ही गंभीर बाब असल्याने डॉक्टरांनी चर्चा करून वेळ न दवडता आईचा जीव वाचविण्यासाठी गर्भाशयाची पिशवी काढण्याचा निर्णय घेतला आणि गर्भाशयाची पिशवी काढून बाळासह आईचेही प्राण वाचवले..केवळ ती आई होती म्हणून देवदूतांनी केलेला हा पराकोटीचा प्रयत्न बाळाला आणि आईलाही वाचवून तर गेलाच…शिवाय त्यांना हे जग सुखाने पाहण्यासाठीही मदत करून गेला…!!











