महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची आत्महत्या ही हत्या नसून आत्महत्याच होती.. हे सीबीआय,एनसीबी, केंद्र सरकार साऱ्यांनी अगदी युध्दपातळीवर शोधून, बरेच काही खणून काढून बाहेर काढले..
सुशांतसिंह राजपूत याची १४ जून रोजी आत्महत्या झाली होती. त्याचा मृतेह त्याच्या फ्लॅटमध्ये आढळून आला होता. त्याच दरम्यान बिहारची निवडणूक समोर असल्याने भाजप नेत्यानी राजपूतांच्या मतांसाठी ही हत्या असल्याचा निष्कर्ष काढला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित करीत राज्यातीलही भाजप नेत्यांनी त्यात उडी घेतली होती. सीबीआयसह एम्स व न्यायवैधक तज्ज्ञांनी तपासणी केल्यानंतर एम्सने हा अहवाल सीबीआयकडे सोपवला. यामध्ये अनेक पुराव्यांच्या आधारे सुशांतची हत्या झालेली नसून ती आत्महत्या असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अर्थात तरीदेखील ही आत्महत्या असल्याचे अजून सीबीआयने स्पष्ट केलेले नाही. गेल्या काही दिवसांत राज्यातही वातावरण यावरून तापले असून गृहमंत्र्यांनी देखील नुकतीच हाथरसच्या घटनेवरून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे.











