ज्ञानेश्वर रायते, बारामती
वयाच्या 23 व्या वर्षी गावाचा सरपंच बनला.. आडनाडल्यांच्या मदतीसाठी तो सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्नशील असतो बारामतीतील सर्वोत्कृष्ट सरपंच असलेल्या माऊलीला दोन वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार घरी जाऊन भेटले. माऊलीची माहिती अजित पवारांना तर मिळालीच होती. पण दादांनी शब्द दिला होता की तुला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद देतो..!
मधल्या काळात अनेक घडामोडी घडल्या. राजकीय कुरघोडी देखील घडल्या, अनेक कारणांनी तालुकाध्यक्षपद लांबले, पण माऊली नेटाने काम करत राहिला. मधल्या काळात लोकसभा विधानसभेच्या निवडणुका झाल्या. ज्येष्ठ नेते शरद पवारांविषयीची सहानभूती असीम स्तरावर असताना देखील जिरायती गावातील बाबुर्डी हे असे गाव होते, जिथे खासदार सुनेत्रा पवार यांना एकतर्फी मतदान मिळाले होते.

पद मिळो अथवा ना मिळो पक्षाची निष्ठा मात्र माऊली पोमणे अर्थात ज्ञानेश्वर पोमणे या युवा कार्यकर्त्याने कायम ठेवली. सन 2021 मध्ये वयाच्या 23 व्या वर्षी ज्ञानेश्वर पोमणे यांनी बाबुर्डी गावचे सरपंचपद भूषवले. कोरोनाच्या काळात जेव्हा कोणी आप्त स्वकीयांसाठी देखील बाहेर पडण्यास धजावत नव्हते, त्यावेळी गावकऱ्यांसाठी औषधे, लसीकरण आणि इतर सुविधांसाठी माऊली आणि त्यांचे सहकारी अविरतपणे कार्यरत राहिले.
गेल्या आठवड्यात बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवड झाली. संदीप बांदल यांची निवड झाल्यानंतर आता युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाचे काय? असा प्रश्न कार्यकर्त्यांनी देखील उपस्थित केला होता! साहजिकच यावेळी ज्ञानेश्वर पोमणे यांच्या गळ्यात तालुकाध्यक्ष पदाची माळ पडणार हे अपेक्षित होते आणि आज त्यांची निवड देखील झाली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित झेंडे व तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.
साध्याभोळ्या शेतकरी कुटुंबातील ज्ञानेश्वर पोमणे यांचा राजकीय वारसा एका पिढी पुरतच. त्यांचे वडील बाळासाहेब पोमणे हे 2020 मध्ये बारामतीच्या बाजार समितीचे उपसभापती होते. गंमत म्हणजे ज्या बाजार समितीच्या बांधकामात त्यांनी हातभार लावला होता, त्याच ठिकाणी त्यांची उपसभापतीपदी निवड झाली होती. अत्यंत साध्या शेतकरी कुटुंबातील युवकाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालुकाध्यक्षपदी निवड केल्याने राजकारणामध्ये येऊ पाहणाऱ्या सामान्य युवा कार्यकर्त्यांना देखील एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे.
माऊली पोमणे यांच्या निवडीनंतर त्यांचे सहकारी व सामाजिक कार्यकर्ते राजकुमार लव्हे म्हणाले, पैशाशिवाय आता राजकारणाचं पानही हालत नाही अशा राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत सामान्य राजकीय कार्यकर्त्यांना मोठमोठ्या समस्या येतात. त्या समस्या माऊलीला देखील येतील, परंतु पक्षनिष्ठेपुढे कशाचीही तमा न बाळगणाऱ्या माऊली पोमणेंसाठी त्या समस्या क्षुल्लकच असतील. एका योग्य कार्यकर्त्याची पदासाठी निवड झाल्याने फार मोठा योग्य संदेश कार्यकर्त्यांमध्ये पोचला आहे.











