कराड : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्रातील पत्रकारितेला लय भारी दिवस दाखवणाऱ्या लयभारी न्युज चे संपादक तुषार खरात यांची मंगळवारी कारागृहातून जामीनावर सुटका झाली. तब्बल 102 दिवस ॲट्रॉसिटी, खंडणी, विनयभंग अशा वेगवेगळ्या केसेस त्यांच्यावर दाखल करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून तुषार खरात वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये तुरुंगात होते. तुषार खरात यांनी जामीन मिळाल्याबद्दल न्यायालयाचे आभार मानले.
तुषार खरात यांच्यावर मुंबईऐवजी माणदेशात गुन्हे दाखल झाले होते. कारागृहातून बाहेर पडल्यावर पत्रकार तुषार खरात यांनी कराडला प्रीतीसगमावर जाऊन कै. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. महाराष्ट्राच्या या शिल्पकाराकडे साहित्यिक विद्वत्ता होती. स्वतः साहित्यिक असून राजकारणी असले तरी समाजातील विचारवंत, विद्वान साहित्यिक, पत्रकार यांचा ते आदर करायचे. कधी अनेकांनी त्यांच्यावर टीका केली, मात्र ते कधीही वैयक्तिक द्वेष करत नव्हते टीका करणाऱ्यांना कधी त्यांनी शत्रू मानले नाही. परंतु हा पुरोगामी विचार आज मात्र सत्ताधाऱ्यांनी वेशीला टांगला आहे.
तुषार खरात यांनी प्रीतीसगमावर गेल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर शपथ घेतली. माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले, तरी देखील महाराष्ट्राची विचारधारा कायम ठेवेल आणि हा पुरोगाम विचार आणि सत्ताधाऱ्यांवर व सरकारवर टीका करण्याचा आमचा अधिकार आम्ही सोडणार नाही असे स्पष्ट केले.











