डॉ. संदेश शहा, इंदापूर
राज्यातील संपलेला ऊस गाळप हंगाम सन २०२४- २५ मधील शेतकऱ्यांच्या गाळप ऊसास रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीची सुमारे ५७ कोटी ३२ लाख रुपये थकीत ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्त सिध्दाराम सालीमठ यांनी संबंधित आठ कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार ( आरआरसी ) जप्तीच्या कारवाईचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
त्यामुळे कारखानदारांचे धाबे दणाणले असून त्यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आदींना साकडे घातले आहे. विशेष म्हणजे एके काळी संपूर्ण देशात सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचे तीन वेळा पुरस्कार मिळालेले तसेच नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील अध्यक्ष असलेल्या पुणे जिल्ह्यातील महात्मा फुलेनगर इंदापूर येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा जप्ती आदेशामध्ये समावेश आहे. त्यामुळे कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
साखर आयुक्त सिध्दाराम सालीमठ यांनी यांनी दिलेल्या आदेशात पुणे जिल्ह्या तील कर्मयोगी कारखान्या सह सोलापूर जिल्ह्यातील तीन, अहिल्यानगर, जालना, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्हातील प्रत्येकी एका साखर कारखान्याचा जप्ती कारवाई आदेशात समावेश आहे. साखर कारखान्यांच्या थकीत एफआरपी रक्कमेवर १५ टक्के दराने देय होणारे व्याज या रक्कमा कारखान्या कडून जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादीत केलेली साखर, बगॅस आणि मोलॅसिस इत्यादी उत्पादनाची विक्री करुन त्यामधून वसूल करण्यात यावी. साखरसाठा बँकेकडे तारण असल्यास तारण नसलेली कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करुन त्याची दिलेल्या पध्दतीने विक्री करुन या रक्कमे तून ऊस नियंत्रण आदेश १९६६ मधील तरतुदी नुसार देयबाकी रक्कमे ची खात्री करुन संबंधितांना विलंबीत कालावधीसाठी १५ टक्के व्याजासह देण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे.
दरम्यान, साखर आयुक्तालयाने हंगाम २०२४- २५ मध्ये थकीत एफआरपी प्रश्नी आत्तापर्यंत एकूण २८ साखर कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश दिलेले आहेत. ही रक्कम सुमारे ५४५ कोटी ८८ लाख ७८ हजार रुपये असल्याची माहिती साखर आयुक्तालयातून देण्यात आली. जप्ती कारवाईचे आदेश देण्यात आलेली साखर कारखान्यांची नावे व रक्कम पुढील प्रमाणे :
पुणे जिल्ह्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना, इंदापूर – ८ कोटी ५८ लाख ५४ हजार रुपये, सोलापूर जिल्ह्यातील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. लवंगी – ता. मंगळवेढा – १ कोटी २७ लाख ५४ हजार रुपये, सोलापूर मधील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. आलेगाव, ता. माढा – २ कोटी ९५ लाख ९ हजार रुपये,
सोलापूर मधील भीमा सहकारी साखर कारखाना, टाकळी सिकंदर- १ कोटी २६ लाख २७ हजार रुपये, अहिल्यानगर मधील केदारेश्वर सहकारी साखर कारखाना, अहिल्यानगर : २५ कोटी ७६ लाख ५ हजार रुपये, जालना जिल्ह्या तील समृध्दी शुगर्स लि. रेणूकानगर, ता. घनसावंगी -१३ कोटी ६३ लाख ४२ हजार रुपये, यवतमाळमधील डेक्कन शुगर्स प्रा.लि., मंगलोर- १ कोटी ११ लाख ९ हजार रुपये, बुलडाणा जिल्ह्यातील पेनगंगा शुगर फॅक्टरी प्रा. लि., वरुडधाड – २ कोटी ७४ लाख ९ हजार रुपयांचा समावेश आहे.
सर्वात कमी अंतरावरून ऊस वाहतूक, कार्यक्षेत्रा त किमान १५ लाख मेट्रिक टन ऊसाची उपलब्धता, सहवीज निर्मितीसह इतर कारखाना प्रकल्प, उजनी धरण पाणलोट क्षेत्रात उपलब्ध असलेले पाणी, दैनंदिन ८ हजार मेट्रिक टन ऊस गाळप क्षमता आदी कर्मयोगी कारखान्याची वैशिष्ट्ये आहेत. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय शंकरराव पाटील तसेच उपाध्यक्ष गोकुळदास शहा यांनी लावलेली आर्थिक शिस्त न पेलवल्या मुळे तसेच पाळता न आल्याने कारखाना टॉप टेन मध्ये आणण्याचे राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि व्यवस्थापनाचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे कारखाना आर्थिक संकटातून मार्गक्रमण करत असल्याचे चित्र आहे.
यासंदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी आत्मपरीक्षण करणे ही काळाची गरज आहे. दरम्यान माजी खासदार स्वर्गीय शंकररावजी पाटील यांचे नाव असलेला कर्मयोगी कारखाना कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी चालवावा अशी मागणी काही शेतकऱ्यांकडून तसेच कारखान्याच्या काही आजी माजी संचालकांकडून होत आहे. त्यास राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, सोनाई दूध संघाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ माने यांनी शेतकऱ्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन सहकार्य करावे अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली आहे. त्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.











