दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाईच्या बाजारपेठेतील रामदेव स्टिल दुकानात झालेल्या घरफोडीचा गुन्हा वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेस उघड करण्यात यश आले असून एक संगणक, सीसीटीव्ही कॅमेरा व ९० हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २२ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते ११ वा चे दरम्यान वाई बाजारपेठेतील रामदेव स्टिल या भांडयाच्या दुकानात अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना घडली होती. यानंतर वाई पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक श्याम पानेगावकर यांनी वाई गुन्हे प्रकटीकरण पथकासह घटनास्थळास भेट देऊन परिसराची पाहणी केली व वाई गुन्हे प्रकटीकरण पथकास अज्ञात चोरट्याचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सुचना दिल्या.
गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी वाई शहरातील विविध सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदार विशाल शिंदे यांना तांत्रिक विश्लेषण तसेच त्यांच्या बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, रामदेव स्टिल येथे काम करणाऱ्या विधीसंघर्षित (अल्पवयीन ) बालकानेच दुकानाच्या वरील पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला व दुकानाच्या गल्ल्यातील सुमारे ९० हजार रुपये, दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे व सीसीटीव्हीची स्क्रिन चोरुन नेली असल्याचे समजले.
त्यानंतर प्रभारी अधिकारी पानेगावकर यांनी सदरच्या विधीसंघर्षित बालकाचा शोध घेऊन त्याच्याकडुन मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सुचना दिल्या. वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरच्या दुकानातील कामगार असलेल्या विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेऊन विचारपूस करुन त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले ९० हजार रुपये, दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे व सीसीटीव्हीची स्क्रिन असा एकुण १ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.











