मुंबई : महान्यूज लाईव्ह
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे कथित भ्रष्टाचार बाहेर काढण्यात व त्यावर आवाज उठवण्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आघाडीवर आहेत. दररोज त्या नवनवे आरोप पुराव्यांसह मांडत आहेत याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या मंत्र्यांवरील आरोपाची चौकशी करणे ऐवजी थेट अंजली दमानिया यांनाच आव्हान दिले आहे.
धनंजय मुंडे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांच्यावरच राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप करत अंजली दमानिया यांच्या खात्यावर 25 कोटींचा बॅलन्स कोणी टाकला हे आम्ही पुराव्यासह लवकरच बाहेर काढणार आहोत. रिचार्ज वाल्या ताईच्या खात्यावर 25 खोक्यांचा बॅलन्स टाकण्यात आला आहे. काहीही काम न करता वर्षाला पंधरा देश फिरणाऱ्या आणि अडीच कोटी रुपयांचा टॅक्स भरणाऱ्या स्वयंघोषित समाजसेविका ताई, कोणाच्या माध्यमातून तुमचा रिचार्ज झाला हे आम्ही पुराव्यांसह लवकरच बाहेर काढू असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी माध्यमांपुढे सांगितले.
मात्र सुरज चव्हाण यांच्या आरोपावरून अंजली दमानिया यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसलाच आव्हान दिले आहे. माझी सर्व खाती आत्ताच्या आत्ता तपासा. मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी आव्हान देत तातडीने माझी बँक खाते तपासावीत असे आव्हान दिले आहे. अंजली दमानिया यांनी सांगितले की, माझा खूप राग आला असला तरी मी मात्र भाषेची पातळी सोडणार नाही.
कुठेही एक दमडी देखील माझ्या खात्यात बेहिशोबी आहे का ते पहावे. राज्यात एवढा भ्रष्टाचार होत असताना मी गप्प बसू? मी लढू नको? स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या लोकांचा असा मानसिक छळ करता? राजकारणात पुढे जाण्यासाठी नेत्याला खुश करण्यासाठी खालच्या पातळीवर जाऊन हे बोलतात, ते योग्य आहे का? महाराष्ट्राच्या मीडियाला माझ्या लढाबद्दल जरा जरी आदर असेल, तरी अजित पवार आणि मुख्यमंत्री यांची तातडीने प्रतिक्रिया घ्या. माझी तातडीने चौकशी करा. माझ्या सगळ्या खात्यांची ताबडतोब चौकशी करा. मी भ्रष्ट असेल तर मला शिक्षा होईल, पण जर मी भ्रष्ट नसेल तर मग सुरज चव्हाण ला योग्य ती शिक्षा द्या!











