इंदापूर तालुक्यातील नेचर डिलाईट डेअरी आणि फलटण येथील गोविंद दूध या दोन दूध प्रकल्पांच्या ठिकाणी कालपासून सुरू असलेली आयकर खात्याची चौकशी अजूनही सुरूच आहे. जीएसटी, दूध अनुदान व इतर मुद्द्यावरून ही चौकशी सुरू असल्याचे कळते. दरम्यान राज्यातील इतरही काही प्रकल्पांची अशा स्वरूपातील चौकशी सुरू असल्याचे समजते.
काल सकाळपासून इंदापूर तालुक्यातील नेचर डिलाईट डेअरी संबंधित पदाधिकारी व दूध प्रकल्पाचे ठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी थांबून आहेत व ते कागदपत्रांची तपासणी करत आहेत तर दुसरीकडे फलटणमध्ये देखील गोविंद दूध आणि गोविंद दूध चे संबंधित संजीव राजे नाईक निंबाळकर व रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या घरीही आयकर विभागाचे अधिकारी थांबून आहेत.
या चौकशीला राजकीय चौकशी व षडयंत्र असल्याचे सांगत विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे, तर दुसरीकडे नेमकी ही चौकशी कशावरून सुरू आहे याची पूर्ण माहिती अद्याप तरी उघड झालेली नाही. आयकर विभागाच्या वतीने देखील याविषयी कोणतेही सुतोवाच केलेले नाही. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीकास्त्र सोडताना केंद्रीय तपास यंत्रणांना तुम्ही स्वायत्त आहात याची जाणीव करून देत किमान तुम्ही तरी अण्णा हजारे सारखे वागू नका असा मंत्र दिला आहे. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने जाहीर केलेल्या दूध अनुदान व जीएसटी संकलन या मुद्द्यावर ताळमेळ बसत नसल्याच्या मुद्द्यावरून राज्यातील काही दूध प्रकल्पांच्या चौकशी सुरू आहेत.











