बारामती : महान्यूज लाईव्ह
धकाधकीच्या जीवनात मोकळ्या हवेत विविध खेळ व उपक्रमांच्या माध्यमातून, मोबाईलपासून दूर राहत वेगळा आनंद अनुभवण्याच्या उद्देशाने एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने बारामतीत प्रथमच हॅपी स्ट्रीटस बारामती या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले, याला बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेतून हा आगळावेळा उपक्रम राबवण्यात आला. रविवारी (ता. 18) विद्या कॉर्नर ते गदिमा सभागृहापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत हा उपक्रम राबविला गेला.
या रस्त्याच्या दुतर्फा आर्ट, म्युझिक, नेचर, गेम, हेल्थ अँड फिटनेस, पर्यावरण असे झोन तयार करण्यात आले होते. आर्ट झोनमध्ये मेंदी, टॅटू, फेस पेंटीग, पोट्रेट, कॅरिकेचर, कॅलिग्रॅफी, टाईम स्केच, वारली पेंटीग यांचा समावेश होता. नागरिकांना याचा मोफत आनंद लुटला. नेचर झोनमध्ये नक्षत्र उद्यानामध्ये आढळणा-या विविध पक्ष्यांची माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली. लहान मुलांसाठी घोडेस्वारी ठेवली होती.
हेल्थ अँड फिटनेस झोन, गेम झोन यामध्ये निरोगी जीवनाबाबत मार्गदर्शन व गेम झोनमध्ये सापशिडी, लुडो, हँड अँड फीट हॉप स्कॉच, टिकटॅक गेम, लगोर, रिंगण, गोट्या, भोवरे, कॅरम, बुध्दीबळ, दोरीवरच्या सामूहिक उड्या असे खेळ विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले होते.. या शिवाय पेनल्टी शूट आऊट, बलून शूट आऊट, आर्चरी, बास्केटबॉल यांचाही यात समावेश होता.
पर्यावरण, म्युझिक झोनसह महिला बचत गटांचे खाद्यविक्रीचे स्टॉल्सही येथे लावण्यात आले होते. मुलांच्या मनोरंजनासाठी कार्टून इमेजेस, जादूगार व विविध खेळही येथे मुलांना मनसोक्त खेळ होते.