सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्याच्या कांदलगाव, हिंगणगाव या उजनीकाठच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून गव्याचा संचार सुरू असल्याचे पुरावे, अगदी व्हिडीओ येऊनही व यापूर्वी हल्ल्याची घटना होऊनही गप्प पडलेल्या वनखात्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. रानगव्यांनी हिंगणगावात चक्क एका म्हशीलाच मारून टाकले आणि शेतकरी हादरून गेले.
हिंगणगाव येथील सतीश खबाले या शेतकऱ्याच्या गोठ्यातील म्हशीवर रानगव्याने हल्ला केला आणि या हल्ल्यात म्हैस जागीच मरण पावली. यात खबाले यांचे तब्बल ८० हजारांचे नुकसान झाले. एक म्हैस मारली, तर दुसरी गंभीर जखमी केल्याने खबाले पुरते हादरून गेले आहेत.
याच महिन्याच्या सुरवातीला ४ जून रोजी एक घटना घडली, ज्यामध्ये रानगव्याने कांदलगाव येथील रोहिदास ननवरे यांच्या अडीच वर्षे वयाच्या म्हशीला रानगव्याने हल्ला करून ठार मारले होते.
म्हशी मेल्यानंतर वनखाते जागे होणार, मग शासनाकडून तुटपुंजी मदत देणार हे कोठपर्यंत चालणार असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकरी उद्विग्न आहेत आणि रानगवे मस्तवाल झालेत… अशा परिस्थितीत वनखाते गप्प का? हा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे.