शिरूर : महान्यूज लाईव्ह
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथील निखिल लक्ष्मण फराटे यांनी उज्ज्वल यश मिळवले असून त्यांची नगरपालिका मुख्याधिकारी पदावर निवड झाली आहे.
मांडवगण फराटा येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या निखिल यांनी शिक्षणानंतर नोकरी केली. त्यानंतर नोकरी करत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पाचव्या प्रयत्नात त्यांना यश येत राज्यसेवा २०२० च्या परीक्षेत त्यांची २०२२ मध्ये नायब तहसीलदार पदावर निवड झाली.
या मिळालेल्या पदावर समाधान न मानता त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली.नायब तहसिलदार पदावर प्रशिक्षण सुरू असताना दररोज सकाळी व संध्याकाळी प्रशिक्षण सांभाळून अभ्यास केला. राज्यसेवा परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात त्यांनी यश मिळवले असून त्यांची नगरपालिका मुख्याधिकारी पदावर निवड झाली आहे.
या यशाबद्दल बोलताना निखिल यांनी सांगितले की, राज्य लोकसेवा आयोगाच्या २०२० च्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर नायब तहसिलदार पदावर निवड झाली होती. मात्र ध्येय मोठे होते. त्यामुळे पुन्हा अभ्यास सुरू ठेवला. अभ्यास व प्रशिक्षण असे दोन्ही सुरू असताना तारेवरची कसरत होती, मात्र कुटुंबाने मोठी साथ दिली. पत्नी, वडील, चुलते, भाऊ यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यामुळे यश मिळवता आले आहे.
तहसीलदार स्वप्नील ढवळे, सिद्धेश्वर मोकाशी, चाणक्य मंडल चे अविनाश धर्माधिकारी, अध्ययन परीवार चे डॉ. संकल्प देशमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील युवकांनी अभ्यासात सातत्य व स्वतःवर विश्वास ठेवून अभ्यास केला तर निश्चित यश मिळते. जिद्द व चिकाटी ठेवायला हवी असा मोलाचा सल्ला ही त्यांनी युवकांना दिला आहे.