बारामती : महान्यूज लाईव्ह
गुजरात निवडणूकीनंतर राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळालेल्या आम आदमी पार्टीने आता महाराष्ट्रात लक्ष केंद्रित केले असून पक्षाची भूमिका गावोगावी घेऊन जाण्यासाठी स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. २९ रोजी ही स्वराज यात्रा इंदापूर, भिगवण, दौंड मार्गे बारामतीत येणार आहे.
यात्रेची सुरुवात 28 मे रोजी पंढरपूर येथे विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाने होऊन 6 जून राज्याभिषेक दिनी रायगड येथे यात्रेची सांगता होणार आहे. स्वराज्य यात्रा सात जिल्ह्यातून जाणार असून या जिल्ह्यातील शहरे व गावांमध्ये सभा होणार आहेत. 782 किलोमीटरचा प्रवास ही यात्रा करेल.
पक्षाचे राष्ट्रीय सह-सचिव व प्रदेश सह-प्रभारी युवा नेते गोपाल इटालिया ज्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला गुजरातमध्ये 13 टक्के मतदान मिळवत आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला, याच इटालिया यांच्या मार्गदर्शनात ही यात्रा होणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष.मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
‘आज महाराष्ट्रात सर्वत्र प्रशासनच राज्य करत आहे. देशातला आणि जगातली सर्वात मोठा पक्ष म्हणवून घेणारा भाजप महाराष्ट्रात मात्र हरण्याच्या भीतीने एकही निवडणूक होऊ देत नाही आणि त्यामुळेच प्रशासन मनमानी कारभार करते आहे. भ्रष्टाचारावर कुणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. या दडपशाही विरोधात आवाज उठवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील सुराज्य आणण्यासाठी आम आदमी पार्टी वचनबद्ध आहे’ असे पुरंदर तालुका अध्यक्ष दत्तात्रय कड यांनी सांगीतले.
मागील विधानसभा निवडणुकीनंतर विविध राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीने युती करत सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न केले. या सर्वच प्रस्थापित पक्षांची विश्वासार्हता संपली असल्यामुळेच महाराष्ट्रातील जनता नवीन पर्याय शोधते आहे आणि आम आदमी पार्टी आज काम की राजनीती करणारा नवा पर्याय म्हणून समोर येत आहे.
गेले वर्षभर भाजप – शिंदे गटाचे खोक्यांचे आणि बोक्यांचे राजकारण महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे . एकमेकांवरती टीका करताना जनतेच्या प्रश्नांकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे अशी भावना शेतकरी, कष्टकरी, गृहिणी, युवक, सामान्य नागरिक अशा सर्वच वर्गाची झाली आहे. एकीकडे वाढती महागाई असताना शेतकऱ्यांचे, नोकरीचे प्रश्न तसेच शाळा फी दवाखाने आदी प्रश्नाबाबत प्रस्थापित विरोधी पक्ष सुद्धा आवाज उठवण्यास तयार नाहीत. अशा वेळेस सामान्य जनतेचा म्हणजेच रयतेचा आवाज बनून आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरू पाहत आहे.
येणाऱ्या वर्षभरात स्थानिक तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार आहेत. आम आदमी पार्टी आता सर्वच निवडणुका लढवण्याची तयारी करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वेगळ्या गावांमधून पश्चिम महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावांमधून ही यात्रा काढली जाणार आहे.
यात्रे दरम्यान आम आदमी पार्टीचे शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील काम, दिल्ली मॉडेल चे यश आणि फायदे हे जनतेस सांगण्यात येणार आहेत. यात्रेच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मजबूत संघटन बांधणीची तयारी आम आदमी पार्टी करीत आहे. या स्वराज्य यात्रेनंतर राज्याच्या इतरही भागात अशाच पद्धतीची यात्रा काढण्याचा पक्षाचे नियोजन असल्याचे माळेगाव येथील आपचे कार्यकर्ते अरविंद बनसोडे यांनी यावेळेस बोलताना सांगीतले.
उद्या सोमवार ( दि. २९ ) रोजी सायंकाळी 6.00 वाजता बारामती येथे यात्रेचे आगमन होईल. पाटस रोड . ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात यात्रेचे स्वागत करण्यात येईल. यानंतर 6.30 वाजता स्वराज्य फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही फेरी महात्मा फुले वसतीगृह पाटस रोड येथून सुरु होऊन.गुणवडी चौक, इंदापूर चौक, भिगवण चौक मार्गे जाऊन बारामती नगरपालिकेसमोर फेरीची सांगता होईल.
स्वराज्य यात्रेनिमित्त सोमवारी बारामती नगर परिषद समोरील पटांगणात सायंकाळी स्वराज फेरीची सांगता झाल्यानंतर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय सह-सचिव गोपाल इटालिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सभेसाठी नागरिकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बारामती शहरातील आपचे कार्यकर्ते अड. रविराज मोरे यांनी केले आहे.