माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. २७ – जमिनीच्या व्यवहाराच्या कारणावरून भावाला शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका महिलेला तिघांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, मारहाण करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप तिघांनाही अटक केली नसून त्यांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप जयवंत बांदल, प्रसाद कालीदास कोंडे दोघेही रा. खेडशिवापुर ( ता. हवेली ), आकाश नंदकुमार डिंबळे रा. शिवरे ( ता. भोर ) अशी गुन्हा दाखल असलेल्यांची नावे असून दि. २६ रोजी खेडशिवापुर टोलनाका येथील एका हॉटेल समोर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पिडीत महिलेने याबाबत राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपींचा शोध सुरू असल्याचे तपासी अंमलदार पोलीस हवालदार राहुल कोल्हे यांनी माहिती दिली.
प्रदिप बांदल याने घरी येवून भावाला मारण्याची धमकी दिली असल्याबाबत महिलेने फोनवरून जाब विचारला असता बांदल याने टोलनाक्याजवळ या, आपण समोरासमोर बोलू असे सांगितल्याने फिर्यादी या त्यांच्या भावासह खेडशिवापुर येथे गेल्या. यावेळी फिर्यादी यांचा मावस भाऊ हे प्रदीप बांदल व सुशील सोंडकर ( ता. भोर ) यांच्याशी बोलत असताना प्रसाद कोंडे याने फिर्यादीच्या भावाला ‘तु आमचे पैसे कधी देणार आहेस’ असे म्हणत मारहाण केली.
प्रदीप बांदल याला महिलेने अटकाव करत ‘तुझा आणि माझ्या भावाचा कोणताही व्यवहार नाही. सुशील सोंडकर यांच्याशी व्यवहार असून भावाला का धमकी देतो? असा जाब विचारल्याने प्रदीप बांदल याने अचानक महिलेला मारहाण करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच आकाश डिबळे याने देखील फिर्यादी महिलेला मारहाण केली असून प्रसाद कोंडे याने फिर्यादीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.