किशोर भोईटे, महान्यूज लाईव्ह
गुणवंत कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्य पुणे ग्रामीण विभाग जिल्हाध्यक्षपदी सणसर येथील महाराष्ट्र शासन व गणराया अवार्ड प्राप्त आझाद तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे महाराष्ट्र शासन गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त प्रकाश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे मंडळाच्या अध्यक्षा डाँ भारती चव्हाण यांनी जाहिर केले.
गुणवंत कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्य कोअर सदस्य यांची विशेष सर्वसाधारण सभा २ डिसेंबर २०२१ रोजी कामगार कल्याण भवन, संभाजीनगर, चिंचवड, पुणे येथे संपन्न झाली. राज्यातील विविध जिल्ह्यात गुणवंत कामगारांच्या प्रश्नांवर हे गुणवंत कामगार कल्याण मंडळ काम करीत असुन कामगार व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी करीत असलेले प्रयत्न व सामाजिक कार्य लक्षात घेऊन शिंदे यांचेवर जिल्ह्यातील ग्रामीण विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
या प्रसंगी संस्थापक अध्यक्षा डाँ.भारती चव्हाण, सचिव राजेश हजारे, सहसचिव संजय गोळे, खजिनदार सदस्य भरत शिंदे, श्रीकांत जोगदंड, कल्पना भाईगडे, पुणे शहराध्यक्ष महादेव धर्मे व सदस्य संपत खैरे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष बशिर मुलाणी, खजिनदार चंद्रकांत लव्हाटे व सदस्य भरत बारी यासह गुणवंत कामगार आणि केंद्र संचालक संजय सुर्वे उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्यातील गुणवंत कामगारांचे विविध प्रलंबित प्रश्नासह पुणे जिल्ह्यातील गुणवंत कामगारांच्या विविध रखडलेल्या प्रश्नांवर चर्चा होऊन त्यावर त्वरित कार्यवाही करून निर्णय घेण्याचे ठरले. प्रकाश शिंदे यांच्या निवडीने त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रकाश शिंदे यांचे निवडीबद्दल अभिनंदन करून व त्यांनी महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार कल्याण मंडळाची माहिती घेऊन गुणवंत कामगारांना येणाऱ्या अडचणींवर सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.