इंदापूर : महान्यूज लाईव्ह
सुरेश मिसाळ
इंदापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र लुमेवाडी येथील हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपुरी दर्गाहला येण्यासाठी नीरा नदीवरील पंचवटी बंधारा ते दर्गा व अकलाई बंधारा ते दर्गा हे रस्ते अनेक वर्षापासून प्रलंबित होते. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे काही दिवसापूर्वी लुमेवाडीच्या बाबांच्या दर्गाह उरुसावेळी दर्शनास आले असता, अनेक भाविकांनी हा रस्ता व्हावा अशी मागणी केली होती. यावेळी भरणे यांनीही रस्त्यासाठी निधी देत असल्याची ग्वाही दिली होती. आता ग्रामस्थांना व भाविकांना दिलेला शब्द खरा करत भरणे यांनी 50 लाखांचा निधी या रस्त्यासाठी मंजूर केला असल्याची माहिती दिली.
राज्यमंत्री भरणे म्हणाले, हाफिज साहेब बाबावर माझी व माझ्या कुटुंबाची श्रद्धा असून सततपणाने आम्ही दर्शनासाठी येत असतो. नीरा नदीवरील पंचवटी बंधारा ते दर्गा व अकलाई बंधारा ते दर्गा हे रस्ते अनेक वर्षापासून प्रलंबित होते. या रस्त्यासाठी जादा लागणा-या वाढीव निधीची कमतरता आपण कदापी भासू देणार नाही. गावाच्या विकासासाठी यापूर्वीही निधी दिला आहे, व भविष्यातही निधीची कमतरता भासू देणार नाही असे यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे स्पष्ट केले.
यावेळी सदरचा निधी हा ग्रामविकास 3054 रस्ते दुरुस्ती कार्यक्रमअंतर्गत मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. या रस्त्यामुळे अकलूज सारख्या मोठ्या बाजरपेठ असलेल्या ठिकाणी या पंचक्रोशीतील नागरिकांना जाण्याचे सोयीस्कर होणार आहे. दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता अतिशय महत्त्वाचा रस्ता गणला जाईल असेही त्यांनी सांगितले.