जुन्नर : महान्यूज लाईव्ह
” जंगलातील वन्य प्राणी पाण्यासाठी गावात येतात, जर त्यांना जंगलातच पाणी मिळाले तर ते गावात येणार नाहीत. त्यातून माणूस आणि वन्य प्राण्यांचा संघर्ष टळेल. ” बिबट्यांचा तालुका म्हणून देशभरात प्रसिद्ध पावलेल्या जुन्नर तालुक्यातील निवृत्त सैनिक व सध्या वनखात्यात वनसंरक्षक म्हणून काम करणाऱ्या रमेश खरमाळे यांचे हे विचार आहेत. पण केवळ विचार करून थांबतील ते खरमाळे कसले !
त्यांनी आपल्या सगळ्या कुटुंबासोबत हातात कुदळ, फावडे धरले आणि तालुक्यातील डोंगरउतारावर जलशोषक समतोल चर खोदण्याचे काम सुरू केले. ६० दिवस काम करून त्यांनी ७० चर खोदले आहेत. हे सगळे चर काल झालेल्या अवकाळी पावसाने भरून गेले आहेत.
रमेश खरमाळे यांनी सैन्यात १७ वर्षे काम केले. त्यानंतर आता वन विभागात वनसंरक्षक म्हणून काम करीत आहेत. वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, किल्ले संवर्धन, बारवांचे संशोधन अशा विविध उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. जोडीला त्यांच्य पत्नी स्वाती खरमाळे या असतात. या दोघांनी मिळून वर सांगितलेला पराक्रम घडवून आणला आहे.
विशेष म्हणजे पहाटे ५.३० ते ९.३० या वेळेत ते सलग ६० दिवस काम करत होते. याप्रमाणे त्यांनी एकुण ३०० तास काम केले आणि ४१२ मीटर चर खोदले.
अर्थातच त्यांचा हा ऐवढाच कारनामा नाही. लॉकडाऊनच्या काळात २७०० रोपे माती, पाणी आणि खुरपणी करून त्यांनी जिंवत ठेवलेली आहेत. त्याहीपुर्वी स्थानिकांची मदत घेऊन पशुपक्षांसाठी ६ पाणवठे त्यांनी बनविले आहेत.
एखादा प्राणी किंवा पक्षी संकटात असल्याची खबर त्यांच्यापर्यंत पोचली तर कितीही त्रास घेऊन त्याला वाचविण्याची धडपड करणारा माणूस ते जुन्नरमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यामुळे घरात आढळलेल्या सापापासून ते माणसांच्या जंगलात बावरलेल्या बिबट्यापर्यंत अनेकांना जीवदान देण्याचे पुण्य त्यांच्या गाठी आहे.
तु्म्ही ८३९०००८३७० किंवा ९३२५४८८१६६ या नंबरवर संपर्क साधून त्यांचे अभिनंदन करू शकता.