बारामती : महान्यूज लाईव्ह
भारतातल्या कोणत्याही प्रश्नामध्ये पाकिस्तान केव्हा आणि कसा मध्ये येईल हे देवही सांगू शकत नाही. आता ताज्या प्रकारात उत्तर प्रदेश सरकारने दिल्लीतील प्रदूषणाबाबत पाकिस्तान दोषी असल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात केला.
त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानेही मग आता पाकिस्तानातील कंपन्यांवर बंदीचा आदेश आम्ही द्यावा अशी तुमची इच्छा आहे का ? असा उद्विग्न सवाल उत्तर प्रदेश सरकारच्या वकिलांना केला.
दिल्लीतील प्रदूषणाबाबत अत्यंत कडक धोरण स्विकारलेल्या सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सूनावणीदरम्यान हा प्रकार घडला. उत्तर प्रदेश सरकारचे वकील रंजीत कुमार यांनी न्यायालयाला सांगितले की दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेशातील कंपन्या जबाबदार नाहीत, तर पाकिस्तानातून येणाऱ्या दूषित हवेमुळे प्रदूषण वाढत आहे.
दिल्लीच्या हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या आयोगासमोर जाऊन हा मुद्दा मांडण्यास अखेर न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला सांगितले. सध्या हा आयोग हे प्रदूषण कमी करण्यासाठी कोणते उपाय योजता येतील यावर काम करीत आहे. कालच सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कडक भूमिका घेत २४ तासात यावरील उपाययोजना सादर करण्याचे आदेश दिले होते.