इंदापूर : महान्यूज लाईव्ह
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि शेतकरी रात्रभर महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शने केल्यानंतर तिथेच झोपले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दुसरीकडे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आणि महावितरणच्या कार्यालयात अधिकारी यांच्यासमवेत अत्यंत महत्त्वाची व तातडीची बैठक बोलावली आहे. यामुळे इंदापूरच्या वीजबिल वसुलीच्या संदर्भातील प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
महावितरणने शेतकऱ्यांची वीज तोडू नये आणि ज्यांची तोडली आहे, त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करावा अशी प्रमुख मागणी करत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह काल इंदापुरात आंदोलन सुरू केले. या धरणे आंदोलनाचा संध्याकाळचा केंद्रबिंदू हा महावितरणच्या कार्यालयासमोर सुरू झाला आणि रात्री उशिरापर्यंत निदर्शने केल्यानंतर हर्षवर्धन पाटील तिथेच झोपले.
संध्याकाळी महावितरण आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात तोडगा न निघाल्याने हर्षवर्धन पाटील महावितरण कार्यालयाच्या आवारात ठाण मांडून होते. जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची हर्षवर्धन पाटलांची भूमिका आहे.
दुसरीकडे गेल्या चार दिवसांपासून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे महावितरणच्या मंत्री स्तरापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत चर्चा करताहेत. आज त्यांनी या संदर्भात अत्यंत महत्त्वाची इंदापूर तालुक्याची संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक सकाळी नऊ वाजता होणार आहे. या बैठकीतून वीज बिल वसुली आणि शेतकऱ्यांच्या विद्युत रोहित्र सोडवण्याच्या महावितरणच्या पद्धतीवर मार्ग निघण्याची चिन्हे आहेत.











