घनश्याम केळकर, बारामती
अवघ्या दोन वर्षात 13 लाख सबस्क्रायबर्स आणि 31 कोटी दर्शक संख्या मिळवलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाच्या ग्रामीण भागातील मराठी वेब सिरीजने कोरोना च्या काळात समाजाचे असणे आणि हसणे सुसह्य केले…! ती बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथील युवकांनी सुरु केलेली चांडाळ चौकडीच्या करामती ही मराठी वेब सिरीज उद्या म्हणजे रविवारी शंभरावा भाग प्रदर्शित करत आहे. या भागाचे वैशिष्ट्य असे की, देशभक्ती आणि समाजहित यांची नाळ जोडणारा हा एपिसोड या वेब सिरीज मधील सर्वात बिग बजेट एपिसोड आहे..
या एपिसोडची सध्या उत्सुकता असून चांडाळ चौकडी च्या करामती वेब सिरीजचे निर्माते भरत शिंदे, पत्रकार रामदास जगताप आणि सुभाष मदने यांनी सांगितले की, गेली शंभर आठवडे आम्ही महाराष्ट्रासह देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी दर्शकांना एक निखळ आनंद देण्याचा प्रयत्न केला. गावगाड्यात घडणाऱ्या दररोज च्या करामती नैसर्गिकरीत्या लोकांसमोर आणत गेल्याने लोकांना त्या आपल्या; स्वतःच्या; आपल्या परिसरातील व आपल्या गावच्या वाटल्या. आणि त्यातून ही मालिका फुलत गेली. गेली शंभर आठवडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक चाहते दररोज भेटायला येतात.
या वेब सिरीज मधील मालिकेचा 100 वा भाग तयार करताना तो काहीतरी वेगळा असावा तो भव्यदिव्य असावा अशी या मालिकेशी संबंधित सर्व स्थानिक कलाकारांची अपेक्षा होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे शंभरावा भाग प्रदर्शित करताना त्यामध्ये समाजासाठी काहीतरी विधायक संदेश असावा या हेतूने या भागाची निर्मिती करण्याची सुरुवात झाली. त्यासाठी लष्करातील सैनिक ही संकल्पना पुढे आली. एक घडलेली घटना त्यासाठी आधारभूत मानली आणि फौजी हा भाग आम्ही तयार केला असे रामदास जगताप, भरत शिंदे आणि सुभाष मदने यांनी सांगितले.
जनसामान्य माणसाचे प्रश्न, दुःख, व्यथा हलक्या फुलक्या मार्मिक भाषेत कलात्मक पद्धतीने मांडण्याचे काम या कलाकारांनी केली आहे. अगदी कोरोना महामारीमुळे घराबाहेर पडणे मुश्किल झाले असताना घराघरात हसू फुलविण्याचे काम याच कलाकारांनी केले. गेल्या 23 वर्षांपासून रामदास जगताप, सुभाष मदने, भरत शिंदे यांनी विविध सामाजिक विषयावर मनोरंजनातून प्रबोधन करण्याचे काम केले आहे.
शासनाचे निर्मलग्राम, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, बेटी बचाव, हुंडाबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन, पोलिओ जनजागृती, एड्स जनजागृती, तंटामुक्त गाव अभियान अशा विविध योजनावर प्रकाश टाकण्याचे काम या टीमने तब्बल पाच हजाराहून अधिक प्रयोगाद्वारे केले आहे. या वेबसिरीजद्वारे सुभाष मदने, भरत शिंदे, रामदास जगताप यांनी निर्मिती, दिग्दर्शक क्षेत्रात नावीन्य निर्माण केल्याची प्रतिक्रिया खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
या एपिसोडमध्ये भरत शिंदे (बाळासाहेब), रामदास जगताप, सुभाष मदने, विष्णू भारती, सुदाम नेवसे, संजय खलाटे, तुषार घोरपडे, अमीर अहिवळे,उज्जेन पवार,विशाल वाघमारे, प्रणव मदने, किरण खलाटे, रोशनी मुळीक, गणेश लोणकर, रेणुका पिसे, गौरी कुंभार यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.











