बारामती: महान्यूज लाईव्ह
महिला सबलीकरणाचा संदेश जेथून सुरुवातीला दिला गेला, त्या बारामतीतील राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी नुकत्याच आलेल्या महापुरात थेट महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेपर्यंत मदतीसाठी धाव घेतली आणि शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर गावातील कुटुंबांना तातडीची मदत केली. खिद्रापूर गावच्या ग्रामस्थांनी या सर्व महिला कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले. (#Baramati #ncp women leaders and volunteer #help in #flood area of #Kolhapur district)
बारामतीतील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अनिता गायकवाड यांच्यासह त्यांच्या सहकारी शोभा मानके, रेहाना शेख, स्वाती बाबर, आदिती घाडगे, रेश्मा ढोबळे, सचिन बाबर, मोहन भाटीयानी, श्रीकांत जाधव, चेतन जाधव, निलेश गायकवाड, राजू मोरे आदींनी थेट खिद्रापुर गावात जाऊन तेथील कुटुंबियांना तातडीची मदत केली.
या मदतीमुळे तेथील ग्रामस्थ देखील भारावून गेले. नुकत्याच आलेल्या महापुरात कोकणासह कोल्हापूर- सांगली पुन्हा एकदा पाण्याच्या वेढ्यात अडकले. त्यामुळे पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रासह अख्खा महाराष्ट्र या सर्व गावांच्या मदतीला धावून गेला. मात्र यामध्ये यावेळी महिला देखील हिरीरीने तेवढ्याच क्षमतेने पुढे आल्याने ग्रामस्थांना देखील मोठे कौतुक वाटले.
याचेच कौतुक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील वाटले. शनिवारी बारामतीत आल्यानंतर त्यांनी या महिलांचे मनापासून कौतुक केले आणि कोणत्याही संकटात अशाच प्रकारे संकटग्रस्तांच्या पाठीशी उभे राहणार्या बारामतीचा अभिमान वाटतो अशा शब्दांत अजित पवार यांनी या महिला कार्यकर्त्यांचे कौतुक केले.