दौंड : महान्यूज लाईव्ह
यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास घरफोडी, दुकाने फोडून होणाऱ्या चोरीच्या घटना लक्षात घेता, खबरदारी आणि दक्षता म्हणून आणि अशा घटनेला आळा बसण्यासाठी पोलीसांची गस्त वाढवण्यात येणार आहे. पोलीस मित्र आणि स्थानिक ग्रामस्थांनी ही पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी केले आहे.
पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलीस पाटलांची नुकतीच बैठक घेतली. पोलीस स्टेशनच्या हद्दीतील यवत, केडगाव, पारगाव, पाटस तसेच इतर गावांमध्ये घरफोडी तसेच छोट्या मोठ्या व्यवसायिकांची दुकाने तोडून चोरी करण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून वाढले आहे.
अशा घटना रोखण्यासाठी आणि हे चोरटे तातडीने पकडण्यासाठी काय उपाय योजना करता येईल यासंदर्भात पोलीस पाटीलांची चर्चा केली. पोलीस पाटलांनी चोरी न होण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेट लावणे, गस्त वाढवणे, गावात सीसीटिव्ही कॅमेरे आहेत का आणि कोणत्या ठिकाणी कॅमेरे लावण्याची आवश्यकता आहे त्याठिकाणी लावण्याचे नियोजन करावे अशी सूचना करण्यात आली.
स्थानिक नागरीकांनी पोलीस दक्षता समिती नियोजन करावे, दारोदारी कपडे विकणारे, भीक मागणारे असे लोक संशयित वाटल्यास आणि रात्रीच्या वेळी कोणी संशयित व्यक्ती फिरताना निदर्शनास आल्यास त्वरीत पोलीस स्टेशनशी संपर्क साधवा, नागरिकांनी ही जागृत रहाणे गरजेचे आहे. लवकरच यवत पोलीस स्टेशनच्या हद्दतील गावांमध्ये ग्रामपंचायत, सरपंच व इतर पदाधिकारी यांची बैठक घेवून याबाबत चर्चा केली जाणार आहे अशी माहिती पोलीस निरिक्षक पाटील यांनी दिली.











