महाराष्ट्र बचावसाठी देशभरातील भाजपचे कार्यकर्ते उतरले, पण…
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
आज संपूर्ण राज्यातच नाही, तर देशात एकच चर्चा होती, ती म्हणजे भाजपच्या आयटी सेलला मान खाली घालायला लावलेल्या महाराष्ट्रद्रोही बीजेपी ट्रेंडची! संध्याकाळी सात वाजता महाराष्ट्रद्रोही बीजेपी १ लाख ४१ हजार ट्विट करीत पहिल्या नंबरवर तर महाराष्ट्र बचाव साठी देशभरातील भाजप कार्यकर्ते समर्थनात उतरूनही ८६ हजारांवर ट्विट घेत महाराष्ट्र बचाव म्हणणारा भाजपचा बलाढ्य आयटी सेल व कार्यकर्ते तिसऱ्या क्रमांकावर होते.
आज महाराष्ट्रात मेरा अंगण, मेरा रणांगण अशी घोषणा देत आंदोलनात उतरलेल्या भाजपची नेटकऱ्यांनी रस्त्यावरही व नेटवरही यथेच्छ धुलाई केली. अंगण भाजपने उभे केले, मात्र रणांगण महाविकासआघाडीने मारल्याचे पाहायला मिळाले. त्यातच भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने लहान मुले आंदोलनासाठी उभी केल्यावरूनही भाजपला प्रचंड टिकेला सामोरे जावे लागले. तीन दिवस प्रचंड तयारी करून अगदी प्रेसनोट तयार करून मुद्देनिहाय कार्यकर्त्यांना समजावल्यानंतरही या आंदोलनावर पाणी फिरले. विशेष म्हणजे माहिती तंत्रज्ञानातही व रस्त्यावरही हे आंदोलन पिछाडीवर पडले. भाजपची प्रमुख पदाधिकारी व नेतेमंडळी आघाडीवर असले तरी सामान्य कार्यकर्त्यांचा तेवढा अपेक्षित प्रतिसाद भाजपला मिळाला नाही. संध्याकाळी मात्र भाजपने पुन्हा कार्यकर्ते मैदानात उतरवत हा ट्रेंडचा मधला अवकाश भरून घेण्यासाठी मेहनत घेण्यास सुरवात केली. मात्र त्याच्या उलट राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विविध ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रद्रोही बीजेपी हा हॅशटॅग वापरून ट्विट केले, त्याला महाविकासआघाडीच्या अगदी मंत्र्यांनीही साथ देत हे युध्द अंगावर घेतले आणि या एकदम अंगावर आलेल्या नेटकऱ्यांमुळे भाजपचा आयटी सेल अगदी कोमात गेला.
अर्थात भाजपविरोधातील हा रोष एका दिवसात आलेला नाही. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून विशेषतः कोरोनाच्या काळात पीएम केअर फंडातच पैसे देण्याचा आग्रह धरण्यास जेव्हा भाजपच्या नेत्यांनी सुरवात केली, तेव्हापासून राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या समर्थकांनी ट्रोलिंगची सुरवात केली. या ट्रोलिंगची सुरवात अर्थातच इंदापूरमधून एक करोड हसणाऱ्यांचा ग्रुप तयार होऊन झाली. या ट्रोलिंगला राज्यभरातील कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांच्या ट्रोलिंगने हैराण होऊन अखेर भाजपच्या नेत्यांना पोलिस ठाण्यांच्या पायऱ्या चढाव्या लागल्या. आज देखील संपूर्ण महाराष्ट्रात नेटकरी पेटून उठले होते, त्याची सुरवात अर्थातच इंदापूरमधल्याच या नेटकऱ्यांच्या म्होरक्यांपैकी एक असलेल्या योगेश सावंत या कार्यकर्त्याकडून झाली आणि पाहता पाहता ट्विटरवॉर चांगलेच रंगले. त्यामुळे योगेश सावंतला राज्यभरातील नेटकऱ्यांकडून स्माईली बादशहा अशी उपाधी मिळाली. भाजप नेत्यांच्या फेसबुक पेजवर जाऊन फक्त हसून यायचे हा उपक्रम यातून पार पाडला गेला, त्याची आयडीया इंदापूरमधून दिली गेली होती.
अर्थात गेल्या सहा वर्षात पहिल्यांदाच भाजपच्या आयटी सेलला कोणीतरी वरचढ झाल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीच्या नेटकऱ्यांनी भाजपच्या या आंदोलनाला अक्षरशः सडकून काढत आंदोलनाची हवा काढून घेतली. संध्याकाळी महाविकास आघाडीने उभारलेल्या महाराष्ट्रद्रोही बीजेपीच्या ट्रोलबरोबरच भाजपा का सफेद झूट हा हॅशटॅगदेखील ट्विटवर २३ हजारांमध्ये होता. त्यामुळे भाजपविरोधी वातावरण ट्विटरवर आज भलतेच गरमागरम झाले होते. जवळपास १ लाख ६६ हजारांच्या आसपास विरोधातील नेटकऱ्यांनी ट्रेंड चालवला होता, पण महाराष्ट्र बचाव त्याच्या निम्म्यापर्यंतच पोचू शकला.











