बारामती : महान्यूज लाईव्ह
18 वर्षापासून प्रौढ व जेष्ठ व्यक्तींपर्यंत च्या कोरोना लसीकरणाच्या लसींची चाचणी देशातून पुण्यामधूनही करण्यात आली होती. आता 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठीच्या लसीची देशभरात चाचणी सुरू असून, एका कंपनीच्या लसीची चाचणी बारामतीत देखील होणार आहे. बारामतीतील बारामती हॉस्पिटलची निवड करण्यात आली आहे. हॉस्पिटलच्या क्लिनिकल रिसर्च स्टडी डिपार्टमेंटमधून ही चाचणी होणार आहे. प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. भास्कर जेधे हे या चाचणीचे इन्व्हेस्टीगेटर असणार आहेत.
तिसऱ्या टप्प्यातील कोरोनाची लाट ही लहान मुलांसाठी बाधक ठरेल, असा अंदाज जागतिक स्तरावर व राष्ट्रीय पातळीवर व्यक्त केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व राज्य सरकारकडून या संदर्भातील वेगवान घडामोडी सुरू आहेत. यामध्ये लवकरात लवकर लहान मुलांचे लसीकरण व्हावे, यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून विविध कंपन्या लहान मुलांच्या लसीचा निर्मितीमध्ये उतरलेल्या आहेत.
यातील एका कंपनीच्या लसीची तिसरा टप्प्यातील चाचणी बारामती हॉस्पिटलमध्ये होणार आहे. बालरोग तज्ञ डॉ. भास्कर जेधे हे मुख्य इन्व्हेस्टीगेटर असणार आहेत. यामध्ये 12 ते 18 वयोगटातील शंभर स्वयंसेवक मुलांची निवड होणार असून, त्यांची rt-pcr आणि covid अॅंटीबॉडी टेस्ट करून त्यानंतर त्यांना 28 दिवसांच्या अंतराने 0.2 मिली लसीचे डोस तीन वेळा दिले जाणार आहेत. त्यानंतर पुन्हा त्यांची covid अॅंटीबॉडी टेस्ट केली जाणार आहे. अगोदरची परिस्थिती आणि नंतरची परिस्थिती यावरून लसीची कार्यक्षमता तपासली जाणार आहे.
दरम्यान दिल्लीतील एम्स रुग्णालयात देखील स्वदेशी बनावटीच्या लसीच्या मुलांवरील चाचण्यांना सुरुवात झाली आहे. यामध्ये दोन ते अठरा वर्षाच्या दरम्यान च्या मुलांसाठी लसीकरणाला सुरुवात झाली. पाटण्यातील एम्समध्ये भारत बायोटेक या कंपनीच्या तयार करण्यात आलेल्या लसीची चाचणी सुरू असून. पाटण्यामध्ये 525 मुलांना लसी देण्यात आल्या आहेत.
भारतात अजून लहान मुलांसाठी कोणतीही लसीसाठी पूर्ण मान्यता मिळालेली नाही . सर्व vaccines स्टडी phase मध्ये आहेत . Herd immunity येण्यासाठी लहान मुलांचे लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे . या trials चा अभ्यास पूर्ण झाल्यावर त्यासाठी गती येईल असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.











