विशाल कदम : महान्युज लाईव्ह
उरुळी कांचन: हवेली तालुक्यात मे २०२० मध्ये ढगफुटी, गारपीट आणि अवकाळी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होऊन आर्थिक हानी झाली होती. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासनाच्या वतीने नुकसानभरपाई थेट त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात आली होती. मात्र, ऑनलाईन प्रणालीमध्ये त्रुटी झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांना धनादेश देण्यात येत असल्याची माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली.
शिंदवणे (ता. हवेली) येथे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते २५ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना गुरुवारी (ता. २७) धनादेश वाटप करण्यात आले. त्यावेळी बोलताना आमदार पवार यांनी वरील माहिती दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील, अप्पर तहसिलदार विजयकुमार चोबे आणि कृषी अधिकारी एस.एम.चव्हाण आदी उपस्थित होते.
आमदार पवार म्हणाले की, शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. तो निस्वार्थपणे शेती करून एका प्रकारची देशसेवाच करीत आहे. परंतु, वारंवार होण्याऱ्या अतिवृष्टीमुळे तो आर्थिक संकटात सापडला आहे. त्याला या नुकसानीतून बाहेर काढून सहकार्य करणे हे आपले कर्त्यव्य आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने त्याला आर्थिक मदत करण्यात आली आहे. परंतु ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांनाही लवकरच धनादेश देण्यात येणार आहे.
यावेळी सरपंच मनिषा महाडीक, मंडल अधिकारी दीपक चव्हाण, ग्रामविकास अधिकारी डी. आर.पोटे, तलाठी अधिकारी प्रदीप जवळकर, ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान,गतवर्षी मे २०२० मध्ये हवेलीत ढगफुटी, गारपीट आणि अवकाळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना शासनाने कृषी आयुक्तालयाला दिल्या होत्या. त्यानुसार हवेली तालुक्यात प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून हा अहवाल कृषी आयुक्तालयात सादर केला होता. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात आहे.
तृप्ती कोलते-पाटील, तहसीलदार, हवेली : गतवर्षी झालेल्या ढगफुटी, गारपीट आणि अवकाळी पडलेल्या पावसामुळे हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान भरपाई म्हणून १६ हजार ५०० हून अधिक शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या बँकेच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली होती. परंतु, त्यातील काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी चुकीचे खाते क्रमांक, चुकीचा धनादेश आणि ऑनलाईन पद्धतीत आलेल्या अडचणीमुळे सदर रक्कम माघारी आली होती. अशा हवेली तालुक्यातील ५७ गावांमधील १७२७ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५८ लाख २३ हजार ४९४ रुपयांचे धनादेश वितरीत केले जात आहेत.











