दौंड : महान्यूज लाईव्ह
यवत पोलीसांनी लॅाकडाऊन आणि संचारबंदी असतानाही हद्दीतील यवत, पाटस, केडगाव या गावांमधील मोकाट फिरणाऱ्या 39 जणांवर दंडात्मक कारवाई केली. 20 हजार 500 रूपयांचा दंड आज यवत व पाटस पोलीसांनी वसुल केला.
यामध्ये पाटस येथे सर्वात जास्त व्यक्ती विनाकारण फिरताना आढळले आहेत. ही माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात आणि पुणे जिल्ह्यात लॅाकडाऊन आणि संचार बंदी लागू झाल्यापासून पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, महसूल विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासन वारंवार घराबाहेर न पडण्याचे तसेच विनाकारण रस्त्यावर,सार्वजनिक ठिकाणी गावात फिरू नये याबाबत सुचना करीत आहेत.
यवत पोलीस आणि पाटस पोलीस नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सातत्याने दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करून कडक कारवाई करीत आहेत. मात्र तरीही मोकाट फिरणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. गावात, रस्त्यावर दुचाकीवरून ट्रिपल सिट फिरताना दिसतात, तसेच दवाखाना, मेडीकल अशी कारणे पुढे करून फिरणाऱ्यांची संख्या ही जास्त आहे.
यामध्ये 15 ते 25 वयोगटातील युवकांचा समावेश मोठ्या प्रमाणात असल्याचे चित्र आहे. यवत, पाटस आणि केडगाव पोलीसांनी आज सोमवारी ( दि.17 ) दिवसभरात 39 व्यक्ती दुचाकीवर मोकाट फिरत असल्याचे निदर्शानास आल्याने अशांवर दंडात्मक कारवाई केली.
यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील,पाटस चौकीचे उपपोलीस निरीक्षक संजय नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दशरथ कोळेकर, विनोद रासकर, मल्हारी सोडनवर, विनोद चोबे, सुनिल भिसे, विजय भापकर, पोलीस मित्र सोनबा देशमुख आदींनी ही कारवाई केली.











