पुन्हा एकदा गुजरातमध्ये अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून, आंतरराष्ट्रीय बाजारात एका किलोची सात कोटी रुपये किंमत असलेले तब्बल 3,089 किलो चरस अमली पदार्थ विरोधी यंत्रणेने पकडले. या घटनेत पाच आंतरराष्ट्रीय तस्करांना देखील पकडले आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने याची किंमत जाहीर केली नसली, तरी अंदाजे तब्बल 21 हजार कोटी रुपयांचे असल्याचे सांगितले जात आहे.
नौदल, एन सी बी आणि गुजरात पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या या कारवाईत अरबी समुद्रातून एका छोट्या जहाजातून तीन हजार तीनशे किलोग्राम अमली पदार्थ पकडले. यात 158 किलो मेथाफेटामाईन व 25 किलो मॉर्फिन देखील समाविष्ट आहे. गुजरातमध्ये यापूर्वी देखील अशा स्वरूपाचा मोठा अमली पदार्थांचा साठा सापडला होता. गुजरातच्या बंदरातून देशाच्या इतर भागांमध्ये हा अमलीसाठा पाठवला जात असल्याचा संशय केंद्रीय यंत्रणांना आहे त्या दृष्टीने त्यांचा तपास सुरू आहे.
गुजरातच्या बंदरावर एका छोट्या जहाजाच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्याने नौदलाने केंद्रीय अमली पदार्थ विरोधी यंत्रणेच्या साह्याने ही कारवाई केली यामध्ये एक टेहळणी विमानाचा, युद्धनौकेचा व हेलिकॉप्टरचा देखील वापर करण्यात आला. या 3300 किलो अमली पदार्थांमध्ये निव्वळ चरस 3 हजार 89 किलो असल्याचे सूत्रांनी सांगितले. पकडण्यात आलेले पाच आंतरराष्ट्रीय तस्कर हे इराणी व पाकिस्तानी असल्याचे सांगितले जात असून त्यांच्याकडून अद्याप कोणत्याही देशाचा नागरिक असल्याचा पुरावा मिळालेला नाही.