राजेंद्र झेंडे : महान्युज लाईव्ह
दौंड: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे शुक्रवारी व शनिवारी दिनांक २ व ३ ऑक्टोबर २०२६ रोजी बारामती पुरंदर व दौंड तालुक्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या समवेत बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील असणार आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार हे शुक्रवारी हा दौरा सुरू करणार आहेत. शुक्रवारी 2 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता ते बारामती तालुक्यातील निंबूत येथून दुष्काळी पाहणी दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. या दिवशी ते बारामती तालुक्यातील निंबूतसह करंजेपूल, हैळ आणि कठीण फुल या ठिकाणी पाहणी करतील. तर शनिवारी ते बारामती तालुक्यातील मोरगाव येथे मयुरेश्वर मंगल कार्यालयात शेतकऱ्यांशी संवाद साधतील.
यानंतर पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन या दुष्काळी गावात भेट देऊन ते प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा बारामती तालुक्यातील सुपा येथील पूजा गार्डन येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. याच दिवशी दुपारनंतर ते दौंड तालुक्यातील दुष्काळाची पाहणी करणार असल्याची अशी माहिती शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे दौंड तालुका अध्यक्ष रामभाऊ टुले यांनी दिली.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे शनिवार ३ ऑक्टोबर दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर असुन शनिवारी
सकाळी ११:३० वाजता तालुक्यातील खोर, देऊळगाव गाडा व दुपारी १२:०० वाजता पडवी हद्दीतील गायकवाड मळा तळ्याची पाहणी करणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त आणि कमी पर्जन्यमान असणाऱ्या इंदापूर बारामती पुरंदर आणि दौंड तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी तालुक्यातील दुष्काळी गावांमधील गाव तलाव आणि छोट्या मोठ्या बंधारे मधील पाणीसाठा कमी झाला असून विहीरी मधील पाण्याने तळ गाठला आहे. तालुक्यातील जिरायती भागातील अनेक गावांमध्ये सध्या दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली असून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात असून ते शेतकऱ्यांशी संवाद साधून सरकारकडे मदतीची मागणी करणार असल्याचे समजते.











